निसर्गभान – माळरानाचा राजाही संकटात…!

यादव तरटे पाटील << www.yadavtartepatil.com >>

महाराष्ट्रातील सगळय़ाच जंगलात आढळणारा, उघडय़ा माळरानावरसुद्धा वावरणारा लांडगा हा खरा माळरानाचा राजा. ग्रामीण जीवनशैली, मानवी स्वभाव आणि मानवी प्रवृत्तीत कायम जिवंत असणारा लांडगा आता मात्र जंगलातून हद्दपार होताना दिसतोय. पर्यावरणातील लांडग्यांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन तसेच त्यांच्या अधिवासात त्यांना भेडसावणाऱया धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 29 जुलै हा दिवस समर्पित आहे.

पेरणीचे दिवस होते. पेरणी आटोपून घरगडी पुनाजी, बाबा आणि मी सायंकाळी घरी येत होतो. अचानक मागून ’सुगरा बुडी’ धावतच बाबांकडे आली. तिने जोरात हंबरडा फोडला. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. ती हुंदके देत देत बाबांना सांगायला लागली, ‘’पटेल साब मेरी बकरी को लांडगा उठाके ले गया. खुदा के वास्ते उसको बचालो…!” बाबांनी क्षणाचाही विलंब न करता दुसऱया घरगडय़ाला डोळय़ांनी इशारा केला. तो गडी गेला तसाच परत आला. लांडग्याने बकरी पळविली होती. सुगरा बुडीचा केविलवाणा चेहरा पाहून बाबांनी तिला ’कनगी’तली ज्वारी द्यायला सांगितली. सुगरा बुडीला बकरी गेल्याचे शल्य होतेच, पण त्याच वेळी तिचा हसरा चेहरा बरेच काही सांगून गेला. माझ्या बालमनात लांडग्याबद्दलचे असे अनेक किस्से आजही जिवंत आहेत. ग्रामीण जीवनशैली, मानवी स्वभाव आणि मानवी प्रवृत्तीत कायम जिवंत असणारा लांडगा मात्र आता जंगलातून हद्दपार होताना दिसतोय. लांडग्याच्या या आठवणी आता केवळ आठवणीच राहिल्या आहेत. लहानपणीच्या शाळेतल्या पुस्तकातला लांडगा आता संकटग्रस्त झालाय. लांडग्याने आता शेती-शिवाराचा आसरा घेतलाय. बकरी पळविणे तर दूरच, आता खुद्द लांडग्यालाच पळता भुईसपाट झाली आहे.

लांडगा आणि मानव हे नाते प्राचीन आहे. किमान 15 हजार वर्षांपासून लांडगे हे मानवांशी संबंधित आहेत. पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते लांडग्यांचे अवशेष मानवी प्राचीन वसाहतींच्या अगदी जवळ आढळलेले आहेत. एक शक्यता अशीही वर्तविली आहे की, आदिमानवांनी लांडग्यांबरोबरच शिकार केलेली असावी किंवा त्यांना पाळीवदेखील केलेले असावे असाही इतिहास आहे.

पर्यावरणातील लांडग्यांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन तसेच त्यांच्या अधिवासात त्यांना भेडसावणाऱया धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दि. 29 जुलै हा दिवस समर्पित आहे. हा दिवस दरवर्षी संपूर्ण जगभर जागतिक ‘लांडगा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या सुंदर प्राण्याचे सौंदर्य आणि अन्न साखळीतील महत्त्व तसेच त्याचे संरक्षण व संवर्धनासाठी प्रचार करण्याचा हा दिवस आहे. जगभरात हा दिवस वेगवेगळय़ा संवर्धन संस्था, वन्य जीवप्रेमी आणि प्राणी प्रेमी साजरा करीत असले तरी हिंदुस्थानात मात्र फारसे कुणाला याबाबत माहिती नाही. व्याघ्र दिनाच्या पलीकडे आम्ही अजून तरी गेलेलो नाही. माझ्या बालपणात ’लांडगा आला रे’ या शाळेच्या पुस्तकातील गोष्टीतच लांडगा बंदिस्त झालाय का? हा प्रश्न मला पडतो आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचेदेखील होणार नाही. कारण वास्तव भयाण आहे. उपेक्षित लांडग्याची अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी होत असलेली फरफट मनाला चटका लावणारी आहे.

वाघोबा महाराज, बिबटे युवराज, तर लांडगा सरदार असेच मी म्हणेन. जिथे घनदाट जंगल तिथे वाघ शिखर प्रजाती, तुलनेने कमी घनदाट जंगल तिथे बिबटे, तर घनदाट जंगलासह काटेरी झुडपी जंगलात व माळरानात लांडगा असतो. यांच्या सीमा जरी निश्चित नसल्या तरीही त्यांचा आवडता अधिवास हाच आहे. बिबटय़ांनी अनुकूलन क्षमता साधून चक्क उसाच्या मळय़ातही आपले बस्तान मांडले तर लांडगादेखील यात कुठेच मागे नाही. विदर्भात लांडगे आता शेती-शिवारात सहज वावरताना दिसत आहेत. गवती कुरणांची जागा आता शेती व विकास प्रकल्पांनी घेतल्याने लांडग्यांनी अनुकूलन साधत आपले बस्तान आता शेती-शिवारात मांडल्याचे वास्तव आहे.

माणसाने अनेक प्राण्यांचे नामकरण केलेय, उदा. ‘लबाड लांडगा’, ‘धूर्त कोल्हा’ आणि हे नामकरण इतके पक्के झालेय की, त्या प्राण्यांचे हे टोपण नाव उच्चारताच चक्क त्या प्राण्यांची आकृती उभी होते. ‘लबाड’ हा शब्द तोंडात येताच डोळय़ांत लांडग्याची आकृती आल्याशिवाय राहत नाही. लबाड लांडग्याची ही उपमा लांडग्याचा संकुचित परिचय करून देणारी आहे. लांडगा, गवताळ व झुडपी प्रदेश आणि माणूस यांचे बहुपदरी नाते आता पूर्वीसारखे राहिले नाही. लांडगे दिसणे आपल्याला आता दुर्मीळ झाले आहे. त्यांची संख्या झपाटय़ाने कमी झाली हे एक कटू वास्तव आहे. सन 2004 च्या आकडेवारीनुसार संपूर्ण हिंदुस्थानात केवळ तीन हजार तर महाराष्ट्रात केवळ 400 च्या घरात लांडगे शिल्लक राहिलेले आहेत.

लांडगा हा गवताळ व झुडपी प्रदेशावरील प्रमुख शिकाऱयांपैकी एक प्राणी आहे. महाराष्ट्रात लांडगा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात आढळतो. लांडगे दिवसा, रात्री व प्रसंगी कधीही व मिळेल त्या सावजाची शिकार करतात. मनुष्यवस्तीजवळ असल्यास पाळीव जनावर लांडगे पळवतात. हिंदुस्थानी लांडग्यांची आजमितीला संख्या दोन हजार ते तीन हजार असून ते गुजरात, राजस्थान, हरयाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांत आढळतात. संपूर्ण जगभरात लांडगावर्गीय जातीच्या एकूण 37 उपजाती आढळतात. हिंदुस्थानात लांडग्यांच्या तीन उपजाती आढळतात. यामध्ये ‘ल्युपस

पॅलिपीस’ हा हिंदुस्थानी लांडगा, ‘ल्युपस चँको’ हा तिबेटी लांडगा, तर ‘ल्युपस ल्युपस’ हा युरोपियन लांडगा आहे. पैकी हिंदुस्थानी लांडगा हिंदुस्थानात सर्वत्र आढळतो.

‘इसापनीती’मध्ये लांडग्याच्या अनेक कथा आहेत. बालगीते अन् बालसाहित्य यात लांडग्याला आजही महत्त्व आहे. लांडगा, कुत्रा आणि कोल्हा हे तिन्ही प्राणी सारखे दिसतात. तोंडाकडे निमुळते होत आलेले लांब डोके, उभे कान, झुपकेदार शेपूट व बारीक पाय अशी लांडग्याच्या शरीराची ठेवण असते. कोल्हा आकाराने सर्वात लहान, रानकुत्रा त्याहून मोठा, तर लांडगा सर्वात मोठा प्राणी आहे. हिरवीगार व पानझडी वृक्षांची दाट अरण्यं लांडग्याला आवडतात. लांडगा 60 ते 75 सेंटिमीटर उंच असून वजन 20 ते 30 किलो असतं. रंग वाळूसारखा असून मागच्या भागाचा रंग थोडा काळसर असतो.

महाराष्ट्रातील सगळय़ाच जंगलात लांडगे आढळतात. ते उघडय़ा माळरानावरसुद्धा वावरतात. उन्हाळय़ात वाळूमधील गुहांमध्ये राहून उन्हापासून लांडगे आपला बचाव करतात. लांडगे दिवसा व रात्री केव्हाही शिकार करतात. दाट जंगलात हरीण, भेकरं, चितळ हे लांडग्याचं खाद्य असतं, तर प्रसंगी मोर व इतर पक्षीदेखील लांडग्यांचं सावज बनतात. गवताळ भागातील धनगर समाज आणि लांडगा यांचे नाते वेगळय़ा प्रकारचे आहे. या धनगरांच्या जनावरांपैकी एखादे लांडग्याने मारले तरीही हे लोक त्यासाठी कधीही भरपाई मागायला येत नाहीत. लांडग्याला रोजच्या जीवनाचा भाग मानण्याची ही त्यांची वृत्ती उल्लेखनीय आहे. जंगल व माळरानाचा कमी होणारा आकार, अधिवासात मानवाचा वाढता वावर, अधिवास विखंडन आणि अवनती यातून लांडग्याच्या परिसंस्थेत अनेक प्रतिकूल बदल झालेत. लांडगे आता शेतीचा आसरा घेऊन राहत आहेत. शेती शिवारातील शेततळे, धुरे व नाल्यांच्या जागेत आपली गुजराण करीत आहेत. कृषी परिस्थितीमध्ये होणारे प्रतिकूल बदल लांडग्यांच्या जिवावर बेतत आहेत. एकीकडे अधिवास हातातून गेला अन् दुसरीकडे असलेल्या अधिवासात असलेली प्रतिकूलता चिंताजनक आहे. लांडगा प्राणी अतिशय उपयोगी असून त्याचेही रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. वाघ, बिबटे, अस्वलाच्या पंगतीत आपण लांडग्याला स्थान न दिल्यामुळे लांडग्यावर ही वेळ आली आहे. नामशेष होत जाणाऱया लांडग्याला अभय मिळाले तर हा जंगलाचा सरदार त्याचे आयुष्य उत्तमरीत्या जगेल. व्याघ्र संवर्धनासह इतर प्राण्यांच्या संवर्धनावरही भर देणे ही काळाची गरज आहे.

 (लेखक वन्य जीव अभ्यासक आहेत)