French Open 2022 – अलेक्झँडर नदालला नडला, वाघासारखा लढला; पण घसरून पडला अन्…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) याने फ्रेंच ओपनच्या (French Open 202) अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. नदाल चौदाव्यांदा फ्रेंच ओपनची फायनल खेळणार आहे. नदालचा सामना जर्मनीचा झुंजार खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेता अलेक्झँडर ज्वेरेव (Alexander Zverev) याच्यासोबत झाला. मात्र सामना सुरू असताना ज्वेरेव जायबंदी झाल्याने नदालला अंतिम फेरीचे तिकीट मिळाले.

पॅरीसच्या फिलिप चॅटरियर कोर्टमध्ये शुक्रवारी राफेल नदाल आणि अलेक्झँडर ज्वेरेव यांच्यात उपांत्यफेरीचा सामना रंगला. पहिला सेट टायब्रेकवर गेल्यानंतर नदालने आपला अनुभव पणाला लावला आणि हा सेट 7-6 असा आपल्या नावावर केला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही दोन्ही खेळाडूंमध्ये जबरदस्त रॅली पाहायला मिळाल्या. दुसरा सेटही 6-6 असा टायब्रेकवर असताना अलेक्झँडर ज्वेरेव हा पाय घसरून कोर्टवर पडला आणि वेदनेने विव्हळू लागला.

अलेक्झँडर ज्वेरेव याला हालचाल करणेही शक्य नसल्याने अखेर व्हिलचेअरवर बसवून त्याला बाहेर नेण्यात आले. थोड्या वेळाने त्याने कोर्टवर कमबॅकही केले. परंतु तो कुबड्यांचा आधार घेऊन कोर्टवर उतरला. त्याची ही अवस्था पाहून मैदानात उपस्थित चाहत्यांनी उभे राहून त्याचे कौतुक केले आणि टाळ्यांचा गडगडाट करत त्याच्या धैर्याला सलाम केला. या अवस्थेमध्ये तो पुढे सामने खेळू शकणार नसल्याने नदालला बाय मिळाला आणि तो अंतिम फेरीत पोहोचला.

5 जूनला अंतिम सामना रंगणार

दरम्यान, पाच जून रोजी फ्रेंच ओपनचा अंतिम सामना रंगणार आहे. राफेल नदालची टक्कर नॉर्वेच्या कॅप्सर रूड याच्याशी होणार आहे. दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यामध्ये रूड याने क्रोएशियाच्या मारीन सीलीच याचा तीन तास चाललेल्या लढतीत पराभव केला. रूडने सीलीच याचे आव्हान 3-6, 6-4, 6-2 आणि 6-2 असे चार सेटमध्ये परतवून लावले. या विजयासह रूड पहिल्यांदाच ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचला आहे.