
खुनाच्या प्रयत्नात मागील वर्षभरापासून फरारी असलेल्या सराईत आरोपीला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने अटक केली. इस्माईल मौलाली मकानदार (वय 26, रा. संतोषनगर, कात्रज) आणि त्याचा साथीदार सलमान महंमद इसाक नायाब (वय 28, रा. कात्रज) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एक भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एकाच्या खुनाच्या प्रयत्नातील वर्षभरापासून फरारी आरोपी नवले ब्रीज परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार सुमित ताकपेरे आणि नीलेश शिवतरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून इस्माईल आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी इस्माईल याचेवर खुनाचा प्रयत्न, खंडणी व आर्म अक्टचे गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे , पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक शुभांगी नरके, शेख, पोलीस हवालदार निलेश शिवतरे पोलीस नाईक गणेश ढगे व पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे यांनी केली आहे.



























































