
मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन अशी घोषणा करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाले. या निवडीनंतर त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आला, पण हा प्रस्ताव गाजला तो दोन्ही बाजूंनी झालेल्या राजकीय टोलेबाजी आणि फटकेबाजीने.
‘मी इथे येईन असं कधीही बोललो नव्हतो…तरीही मला इथे यावं लागलं,’ असा जोरदार टोला लगावत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नव्या विरोधी पक्षनेत्यांचं अभिनंदन केलं तेव्हा सभागृहात हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. या फटकेबाजीला साथ मिळाली ती जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्या टोलेबाजीची. फडणवीसांनीही हे ‘शोले’ स्टाईल अभिनंदन असल्याचे सांगत ‘मी पुन्हा येईन म्हणालो होतो, पण टाइमटेबल सांगितलं नव्हतं,’ असे उत्तर देत विरोधी बाकावरील आपल्या सदस्यांचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला.
मी इथे येईन असे म्हणालो नव्हतो तरी आलो!
असं म्हटलं जातं की आयुष्य ही एक रंगभूमी आहे. कोणत्या भूमिका कधी करायला लागतील हे सांगता येत नाही. इथे यायला एक भाग्य असायला लागतं, कष्ट करावे लागतात. मी म्हणेन मी भाग्याने आलो आहे. मी नशीबवान आहे. माझ्या मायबाप जनताजनार्दनाच्या आशीर्वादाने मी इथे आलेलो आहे. मी इथे येईन असे कधीही बोललो नव्हतो, तरीही मी आलो, असा जोरदार चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काढला तेव्हा सभागृहात हास्यकल्लोळ झाला.
देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी सोमवारीपर्यंतचा सर्वात नशिबवान मुख्यमंत्री आहे. कारण ज्यांच्या विरोधात इतकी वर्षे होतो ते सोमवारी माझ्या सोबत आहेत आणि ज्यांच्या सोबत 30 वर्षे होतो ते माझ्या समोर आहेत. विरोधी पक्षात मित्रच बसले असल्याने विरोधी पक्षच अस्तित्वात राहणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
या दिवसाची आणि नात्याची अपेक्षा नव्हती!
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, काल माझा पहिला दिवस होता त्यावेळी मी माझ्या मंत्र्यांची ओळख करून सभागृहाला दिली. आपण गेली 25-30 वर्षे एकत्र आहोत, पण आपला परिचय सोमवारी माझ्या हाती आला. हा आधी आला असता तर बरं झालं असतं.(हशा) या दिवसाची आणि या नात्याची मला अपेक्षा नव्हती, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मैत्रीत अंतर नको!
राजकारणात वाद होतच असतात. अजितरावांशी वाद झाले, पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी वाद झाले, अशोकराव, छगनराव सगळ्यांशी वाद झाले. आपण मुख्यमंत्री झालात तेव्हा आम्ही विरोधी पक्षात जरूर होतो. पण माझा एक मित्र मुख्यमंत्री झाला आहे. पण तेव्हा विरोधी पक्षात बसल्यानंतरही आम्ही दिलदारी दाखवली की बर्याच वर्षांनंतर या राज्यात एक सत्तांतर होत आहे. दिवस चांगले येऊ शकतात म्हणून मी माझी भूमिका सोडली आणि पूर्ण साथ तुम्हाला दिली. ते पुढे म्हणाले, आम्ही तुमच्या सोबत होतोच, पण त्यानंतर विरोधी पक्षनेताही तुमच्याकडे आला. ही तुमची किमया आहे. मी तुमच्याकडून काही गोष्ट शिकलेलो आहे. सोमवारी तुम्ही त्या पदावर बसलेले आहात आणि तुम्ही माझे मित्र आहात. विरोधी पक्षनेता माझा जवळचा मित्र आहे. अशा वेळी अंतर नको ठेवूयात.
…अन्यथा मी हा कारभार घरी बसून पाहिला असता
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन तर आहेच. माझा मित्र तिकडे बसलेला आहे, पण माझ्या मनात हे नव्हतं. तुम्ही सोबत असता तर हा सगळा कारभार मी घरी बसून टीव्हीवर बसून पाहत असतो. का केलं आणि कशासाठी केलं? ही जी भूमिका जबाबदारी माझ्यावर आली आहे आणि तुमच्यावरही आलेली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे दोन विरुद्धार्थी शब्द न राहता आपण दोघं मिळून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करूयात, असे बजावतानाच उद्धव ठाकरे यांनी देवेंद्रजी, मी तुम्हाला विरोधी पक्षनेता म्हणणार नाही, परंतु या सरकारमधल्या जबाबदार पक्षाचा नेता म्हणून अभिनंदन करीत असल्याचे सांगितले.
राजकारणात दिलदारी हवी!
मुख्यमंत्र्यांनी राजकारणात कशी दिलदारी हवी हे उदाहरणासह पटवून दिले. सभागृहात लावलेल्या ज्या महापुरुषांच्या तसबिरी आहेत त्या नुसत्या तसबिरी नाहीत तर ती एक प्रेरणा आहे…शक्ती आहे…विचार आहेत. त्यांच्याकडे बघून आपण सोमवारी कारभार करीत आहोत. त्या विचारांचं पालन या सभागृहात व्हायला हवं. लोकशाही कशी असावी हे आपल्या सभागृहात अनुभव घेतलेल्या लोकांना माहीत आहे. छगनराव भुजबळांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाचा उल्लेख केला. या लढय़ात माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे अग्रणी होते. त्या पाच जणांमध्ये आजोबा सेनापती होते. त्या काळात एस. एम. जोशी, यशवंतराव चव्हाण होते. तेव्हा एस. एम. जोशी विरोधी पक्षात असताना त्यांनी प्रश्न विचारला. त्यावेळी एक तरुण मंत्री होते. त्यांनी दिलेलं उत्तर एस. एम. जोशी यांना पटलं नाही म्हणून त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला. त्यावरही तेच उत्तर आलं. चार वेळा प्रश्न केला तरीही तेच उत्तर. शेवटी तो मंत्री म्हणाला, मी माझ्या परीने उत्तर दिलेलं आहे, तुमच्या डोक्यात शिरत नसेल तर मी काही करू शकत नाही. तेव्हा यशवंतराव उभे राहिले आणि ते म्हणाले की, हे तरुण आहेत. त्यांना अनुभव नाही. त्यांच्या वतीने मी माफी मागतो. ही दिलदारी या सभागृहात अपेक्षित आहे. (टाळ्या) त्या काळात पवारसाहेब गॅलरीत बसले होते. त्यावेळी ते सभागृहाचे सदस्य नव्हते. हे सर्व बघत बघतच ते मोठे झाले. 1995 साली जेव्हा सत्ताबदल झाला तेव्हा आपण सोबत होतो. त्यावेळी ते असं म्हणाले हे सरकार नवीन आहे. त्यांना अनुभव यायला हवा. म्हणून पहिले सहा महिने यांना काही विचारायचं नाही. राजकारणात अशी दिलदारी हवी, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शेतकर्यांना चिंतामुक्त करायचंय
मला आशा आहे नवीन काय ते करूया. काल जे काही आपण बघितलं त्यापेक्षा सूचना द्या आम्हाला. सातबारा कोरा करण्याची मागणी केली ती करायलाच हवी. ते आपल्याला करायचंच आहे. मला शेतकर्यांना नुसतं कर्जमुक्त नाही तर चिंतामुक्त करायचं आहे, असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.
हिंदुत्व होतं, आहे आणि राहीलच
मला आनंद आहे की दिग्गज माझ्या सर्व सोबत आहेत. तुमच्यासारखे मित्र माझ्या सोबत आहेत. कारण देवेंद्रजी, गेल्या पाच वर्षांत तुमच्याकडून खूप काही शिकलेलो आहे. मी मनापासून बोलतोय. तुमची-माझी मैत्री कधीही लपवलेली नाही, कधी खासगी बैठकीत लपवली नाही की कधी मैदानातही लपवलेली नाही. त्या मैत्रीत कधी अंतर पडणार नाही. पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही विरोधी पक्षात होतो. त्यावेळी आपली युती नव्हती. पण त्याही वेळी आमचं हिंदुत्व होतंच, सोमवारीही आहे आणि उद्याही राहीलच. पण त्या हिंदुत्वामध्ये दिलेला शब्द पाळणं हेसुद्धा माझं हिंदुत्व आहे. जय श्रीराम बोलायचं आणि दिलेलं वचन तोडायचं हे माझं हिंदुत्व नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मध्यरात्रीची खलबतं करायची नाहीत
मागील पाच वर्षांत मी त्या सरकारला दगा देण्याचा प्रयत्न केला नाही असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्या चांगल्या कामाच्या आड माझी शिवसेना येऊ दिली नाही. सहकार्यांना माझी ताकीद होती की जे बोलायचं ते स्पष्ट बोलायचं, कपट-कारस्थान आणि काळोखात काही करायचं नाही. (हशा) मध्यरात्रीची खलबतं करायची नाहीत. (प्रचंड हशा)
बंद दाराआड काय बोललो ते सांगण्याची संस्कृती नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठरावावेळी झालेल्या प्रकाराची आठवण करून दिली. ते म्हणाले, काल जे काही घडलं त्यानंतर मी सोमवारी दिलदारपणे अभिनंदन केलं. काल मी आल्यानंतर इतक्या वर्षांचे संबंध असल्याने तुमचे अभिनंदन केलं. कुणाला तरी वाटलं मी फडणवीसांच्या कानात काहीतरी बोललो. म्हणून मला विचारलं गेलं तेव्हा मी त्याला सांगितलं की आमच्यात बंद दाराआड आणि कानात काय बोललो हे बाहेर सांगण्याची संस्कृती नाही. (प्रचंड हशा)
मी पुन्हा येईन म्हणालो, पण वेळापत्रक सांगितले नव्हते
‘मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हूँ लौटकर आऊंगा,’…अशी शेरोशायरी करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सदस्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. पण ‘मी पुन्हा येईन म्हणालो होतो, पण वेळापत्रक सांगितले नव्हते, त्यामुळे वाट पाहा,’ या त्यांच्या वाक्यावर मात्र सभागृहात एकच हशा पिकला. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील विश्वासदर्शक ठराव संमत झाला. सभागृहात त्यांचे अभिनंदन करण्याची इच्छा होती. दुर्दैवाने ते करता आले नाही. पण सोमवारी विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, असे ते म्हणाले. गेली अनेक वर्षे त्यांच्यासोबत काम केले आहे. पण काही कारणास्तव आमचे संबंध मागेपुढे झाले असतील. पण मैत्रीचे, जिव्हाळ्याचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे असतात, असे सांगत फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नव्या कारकीर्दीला शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ज्या योजना तयार केल्या आहेत त्या पूर्ण करण्याकरिता, जे काही जनतेच्या हिताचे असेल ते करण्याकरिता विरोधी पक्ष म्हणून सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
सत्ताधार्यांची टोलेबाजी ‘शोले’स्टाईल
अभिनंदनाच्या प्रस्तावावर सत्ताधारी बाकांवरून झालेली भाषणे ही अभिनंदनापेक्षा ‘शोले’ सिनेमातील अमिताभने मित्र धर्मेंद्र याच्या केलेल्या स्तुतीसारखेच असल्याचे फडणवीस म्हणाले. अमिताभ धर्मेंद्रचे लग्न जुळवायला जातो आणि म्हणतो, लडका तो अच्छा हैं अशा पद्धतीची भाषणे होती. विरोधी पक्ष म्हणजे शत्रू नव्हे. काल जे विरोधात होते ते सोमवारी सरकारमध्ये बसले आहेत. लोकशाहीमध्ये अशा गोष्टी होत राहतात. ज्या दिवशी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र आले त्यानुसार राजकारणात काहीही होऊ शकते, अशा शब्दांत फडणवीस यांनी सत्ताधार्यांना सुनावले.


























































