
सामना प्रतिनिधी । मुंबई
एसएससी आणि बिगर एसएससी बोर्डाच्या अंतर्गत गुणांच्या वादाचा फटका अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला बसणार असून कॉलेज सुरू व्हायला यंदा ऑक्टोबर महिना उजाडणार आहे. दहावीचा निकाल लागून चार दिवस उलटले तरी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक, उपलब्ध जागांचा तपशील जाहीर झालेला नाही. मागील काही वर्षांचा इतिहास पाहता ऑनलाइन यंत्रणेत होणाऱया गोंधळामुळे अकरावीचे वर्ग सुरू व्हायला ऑगस्ट-सप्टेंबर महिना उजाडायचा. यंदा तर या गोंधळात अंतर्गत गुणांच्या घोळाची भर पडली असून चाचणी परीक्षेबरोबरच सहामाही परीक्षाही बोंबलण्याची चिन्हे आहेत.
मुंबईसह पुणे, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, नागपूर विभागात अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. दरवर्षी निकालाच्या दुसऱया दिवशीच विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले जाते, पण यंदा अजून तरी अकरावीच्या प्रवेशाची हालचाल होताना दिसत नाही. सर्वात आधी अल्पसंख्याक, इनहाऊस आणि व्यवस्थापन कोटय़ातील प्रवेश होतात. त्यानंतर ऑनलाइन प्रवेशाच्या नियमित चार फेऱया राबविल्यानंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेऱयांचे आयोजन केले जाते. ही सर्व प्रवेश प्रक्रिया ऑगस्टपर्यंत सुरू राहते. त्यातच दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱया विद्यार्थ्यांनाही अकरावीच्या रिक्त जागांवर प्रवेश दिला जात असल्याने यंदा अकरावी प्रवेशाचे काही खरे नाही, असे बोलले जात आहे.
अकरावीच्या वर्गांचे 180 शैक्षणिक दिवस पूर्ण होतच नाहीत
कॉलेज उशिरा सुरू होत असल्यामुळे अकरावीच्या वर्गांचे 180 शैक्षणिक दिवस पूर्ण होतच नाहीत असा शिक्षकांचा अनुभव आहे. वेळ कमी असल्याने जादा तास घेऊनही अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. त्यामुळे वर्गात शिकवलेले विद्यार्थ्यांना कळले की नाही हे विचारण्याची संधीही शिक्षकांना मिळत नाही. बोर्डाच्या नियमानुसार अकरावीची अंतिम परीक्षा एप्रिलमध्ये व्हायला हव्यात, पण बहुसंख्य कॉलेजीस् बारावीच्या परीक्षांबरोबरच अकरावीची परीक्षा घेऊन मोकळे होत आहेत.
अकरावीसाठी ऑनलाइन नोंदणी करणारे विद्यार्थी
मुंबई- 1,55,843
पुणे – 68,684
नागपूर – 22,290
नाशिक – 21,311
अमरावती – 4,037
संभाजीनगर – 8,062
यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांमागेच शुक्लकाष्ठ
– हे विद्यार्थी नववीला असताना नववीचा अभ्यासक्रम बदलला
– दहावीत आल्यावर दहावीचादेखील नवीन अभ्यासक्रम
– तोंडी परीक्षा रद्द केल्यामुळे निकालावर परिणाम
– आता अकरावी प्रवेश लांबणीवर पडण्याची चिन्हे
– पुढे अकरावीसाठीदेखील नवीन अभ्यासक्रम
– बारावीची परीक्षाही नव्या अभ्यासक्रमानुसार द्यावी लागणार
अकरावीत अनुदानित जागेवर प्रवेश मिळणे कठीण
एसएससीच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा रद्द करण्याची गंभीर चूक राज्य सरकारने केली आहे. याचा फटका निश्चितच एसएससीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यांच्या गुणवत्तेचे नुकसान तर झालेच आहे, पण अकरावीतही त्यांना अनुदानित जागांवर प्रवेश मिळणे अवघड होणार आहे. नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश हवा असल्यास या विद्यार्थ्यांना भरमसाट फी भरून विनाअनुदानित जागेचाच पर्याय आहे, असे इंडिया वाइड पॅरेंटस् असोसिएशनचे सुनील चौधरी यांनी सांगितले. अकरावीचे वर्ग वेळेत सुरू करायचे असतील तर आता आहे त्या गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्याशिवाय राज्य सरकारकडे पर्याय नाही, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले.
























































