अंबडचा गल्हाटी प्रकल्प ओव्हरफ्लो; परिसरातील गावांना खबरदारीचा इशारा

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सर्वात मोठा असलेल्या गल्हाटी मध्यप्रकल्प पूर्ण भरला आहे. वडीगोद्री मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गल्हाटी नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या शहापूर, दाढेगाव, रेवलगाव, पिठोरी सिरसगाव, घुंगर्डे हादगाव, कोठाळा या गावानां प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील गल्हाटी मध्य प्रकल्पाची पाणी पातळी 457.657 मीटर असून एकूण साठा 16.370 दलघमी आहे. तर उपयुक्त जलसाठा 13.838 दलघमी आहे. तर सांडव्यावरून 712 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने गल्हाटी धरण
कोरडे पडले होते. या धरणावर सुमारे दहा ते पंधरा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. तसेच या प्रकल्पाच्या डावा व उजव्या कालव्याच्या माध्यमातून 12 हजार हेक्टर शेती ओलिताखाली येते. परिसरातील बारसवाडा, शहापूर, दाढेगाव, रेवलगाव,धाकलगाव, पिठोरी सिरसगाव, मठ तांडा, वसंतनगर, सोनक पिंपळगाव, दोदडगाव आदी गावातील शेत जमिनीला या धरणाचा सिंचनासाठी मोठा आधार आहे. या सर्व गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता मिटल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. गल्हाटी धरण क्षेत्रात गेल्या दोन महिन्यांपासून समाधानकारक पाऊस पडत होता. शुक्रवारी वडीगोद्री महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. रात्रभर सुरू असलेल्या पावसाची नोंद 110 मिलिमीटर नोंदवण्यात आली आहे. या मुसळधार पावसामुळे धरणात मोठी आवक सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या