निसर्गगीतांचा मृद्गंध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रतिनिधी

ऋतुमानानुरूप मराठीतील सदाबहार गाण्यांचा नवा कोरा कार्यक्रम ‘गंध हा मातीचा’ रंगभूमीवर येत आहे.

मनाला आल्हाददायक, स्फूर्ती देणारी निसर्गगीतं कानांना आनंद देतातच, पण ती नृत्यासह पाहण्याची संधी मिळाली तर… जुन्या-नव्या अनेक अजरामर निसर्गगीतांचा हा दृकश्राव्य आविष्कार लवकरच रसिकांना ‘गंध हा मातीचा’ या कार्यक्रमानिमित्त अनुभवता येणार आहे. ‘निसर्गराजा’… ‘आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं’, ‘गोमू माहेरला जातो हो नाखवा’, ‘शुक्रतारा मंदवारा’, ‘हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट’, यासारख्या मानव आणि निसर्ग यांच्यातील नात्यांचा सुरेल प्रवास प्रेक्षकासमोर यानिमित्त सादर होईल.

कलारंजना निर्मित मराठी मनाला सुखावणाऱ्या या कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन आणि निर्मिती उदय साटम यांची आहे. आपल्या नव्या संकल्पनेविषयी ते सांगतात की, आजवर लोकपरंपरा, लोकसंस्कृती यावर अनेक कार्यक्रम सादर झाले आणि होत आहेत, मात्र निसर्गगीतांना अनुसरून नृत्य ही एक वेगळीच कलाकृती आम्ही प्रेक्षकांसमोर आणत आहोत. यामध्ये गावरान, भावगीत, कोळीगीत, प्रेमगीत… अशा अनेक निसर्गगीतांचा समावेश आहे. निसर्गाशी संबंधित नेपथ्य असल्यामुळे हा कार्यक्रम लोकांना नक्कीच भावेल.

या कार्यक्रमात ३५ कलाकारांचा सहभाग असून रसिकांच्या मनाला भावणारा हा विषय मांडताना निसर्गगीत, त्याला साजेसं नृत्य आणि निवेदनाचं लिखाण करणं, कार्यक्रमाचं दिग्दर्शन करणं हा माझ्यासाठी एक वेगळा आनंददायी अनुभव आहे. यासाठी संगीत संयोजक सचिन घाग, नृत्य दिग्दर्शक संदीप कांबळे, निवेदक दत्ता चाळके, सुचित ठाकूर या सगळ्यांच्या सांघिक मदतीने  हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

४० निसर्गगीतांचा समावेश

कार्यक्रमाचा जास्तीत जास्त आनंद मिळावा यासाठी नवीन-जुन्या अशा ४० निसर्गगीतांचा यामध्ये समावेश आहे. या गाण्यांची २६ गाणी तयार केली आहेत. ती करताना काही गाण्यांचा अंतरा, काही गाण्यांचे दोन अंतरे, तर काही गाण्यांची चाल आणि नृत्याच्या दृष्टीने सादर करताना एका गाण्याचा दुसऱ्या गाण्याशी असलेला संबंध या मुद्दय़ांचा विचार करून हा कार्यक्रम सादर केला जाईल, अशी माहिती दिग्दर्शक उदय साटम सांगतात.