
>>गणेश आचवल
गडचिरोली ते मुंबई असा प्रवास केलेली, सध्या सोनी मराठीवर ‘‘जिवाची होतिया काहिली’ या मालिकेतून घराघरांत पोचलेली अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर–साळुंखे… एक प्रॉमिसिंग चेहरा.
‘‘जिवाची होतिया काहिली’ या मालिकेत प्रतीक्षा शिवणकर- साळुंखे ही रेवथीच्या मध्यवर्ती भूमिकेत आहे. प्रतीक्षा मूळची गडचिरोली येथील आहे. तिथेच तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. तिचे आई आणि वडील शिक्षक आहेत. त्यांच्या संस्कारातून प्रतीक्षा घडत गेली. तिच्या आईला गायन आणि नृत्य या दोन्ही कलांची आवड, तर तिचे वडीलदेखील शाळेतील विद्यार्थ्यांची नाटकं दिग्दर्शित करत होते. प्रतीक्षाने नागपूरमधून कला शाखेतील पदवी संपादन केली. त्यानंतर ती पुण्यात आली. प्रशांत दामले यांच्या प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन टी-स्कूलमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. तिला तिथे स्कॉलरशिप मिळाली आणि मग प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकात प्रतीक्षाला भूमिका मिळाली. तिने या नाटकाचे आतापर्यंत 520 प्रयोग केले आहेत. कोरोना काळापासून अनेक ठिकाणी ऑनलाइन ऑडिशन मागवली जाते. यासाठी लहान बहीण तिला मदत करते.
‘जिवाची होतिया काहिली’ या मालिकेसाठीसुद्धा तिने ऑडिशन दिली, मग लूक टेस्ट झाली आणि त्यानंतर तिची मालिकेतील ‘रेवथी’ या व्यक्तिरेखेसाठी निवड झाली. प्रतीक्षा सांगते, मुळात या मालिकेत ‘रेवथी’ ही एक कन्नड व्यक्तिरेखा आहे. तिचे बाबा पोलीस असल्याने त्यांची चिंचनूरमध्ये बदली होते आणि मग रेवथीचे कुटुंब हे तात्या रांगडे पाटील यांच्या वाडय़ात राहायला येते. कन्नड अस्मिता जपणारे रेवथीचे वडील आणि मराठी अस्मिता जपणारे तात्या या व्यक्तिरेखांबरोबर रेवथननी आणि तात्यांचा नातू अर्जुन यांची प्रेमकथा तुम्हाला बघायला मिळणार आहे. रेवथीसाठी तिची अम्मा, अप्पा, धाकटी बहीण श्रीदेवी हे सर्वस्व आहेत. ती भरतनाटय़म शिकत आहे. प्रतीक्षा या भूमिकेसाठी भरतनाटय़म शिकतेय. तसेच या मालिकेतील एका एपिसोडसाठी ‘यक्षगान’ हा नृत्यप्रकार सादर होणार होता आणि त्याकरिता प्रत्यक्ष कर्नाटकातून टीम आली होती. त्याकरिता ‘यक्षगान’संदर्भात मालिकेच्या संपूर्ण टीमने जे संशोधन केले, ते प्रतीक्षाला खूप महत्त्वाचे वाटते.
प्रतीक्षाचे पती हे रेडिओलॉजिस्ट आहेत आणि त्यांनाही गायनाची आवड आहे. आपल्या करीअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातच चांगली संधी मिळाल्याने त्या संधीचे सोने करण्याचे तिचे ध्येय आहे.

























































