संस्कृती – महाराष्ट्राच्या लोककला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • प्रा. गणेश चंदनशिवे

भक्ती, प्रबोधन आणि रंजन अशा तीन पातळय़ांवर लोकनाटकाने जनमानसावर आपला प्रभाव पाडला असून महाराष्ट्रातील लोकनाटकांचा किंवा प्रयोगात्म आविष्कारांचा आढावा जर आपण घेतला तर भक्ती, प्रबोधन आणि रंजन या तीन सूत्रांनी सहज हे प्रकार गुंफता येतात. आदिवासी, ग्राम आणि नागर हे आपल्या समाज जीवनाच्या उत्क्रांतीचे तीन प्रमुख टप्पे आहेत. या तीनही टप्प्यांवर लोकनाटक किंवा प्रयोगात्म लोककला आविष्कृत होताना दिसतात.

 

समूहमनाचा गीत, नृत्य, नाटय़मय आविष्कार म्हणजे लोककला होय. प्रयोगात्मता हा लोककलांचा मूळ प्रकृतीधर्म आहे. लोककला हे लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे. समूहमन आविष्कृत होते ते लोककला, लोककथा, लोकगीतांमधून. लोककला कालसंवादी, सहजस्फूर्त आणि उस्फूर्त असतात. पारंपरिकता हा या कलांचा गुणविशेश असतो. विविध मखोटे किंवा मुखवटे, रंगभूषा, वेशभूषा, प्रयोगाची विशिष्ट रंगभूमी आणि वैशिष्टय़पूर्ण कृतींनी लोकनाटय़ अवतरते.

हिंदुस्थानी संस्कृतीत ईश्वरालाच मोठा रंगकर्मी मानले आहे. ‘बहुरूपी रूपे नटला नारायण। सोंग संपादून जैसा तैसा।।‘ ईश्वराचे दहा अवतार अथवा त्याची विविध सोंगे, विविध रूपे ही लोकसंस्कृती आणि नागर संस्कृतीत संकीर्तनाचा विषय झाली आहेत. हे संकीर्तन केवळ गीतगायनातूनच नसते, तर नृत्य व नाटय़ातूनही दृष्टोत्पत्तीस येते. धर्मश्रद्धा हा लोकनाटकाचा मूलाधार होतो हे लक्षात घेतल्याशिवाय आपणाला प्रयोगात्म लोककलांचा विचार करताच येणार नाही.

लोकनाटकात धर्मश्रद्धा, देवदेवतांना प्राधान्य असते, किंबहुना देवदेवतांचे लौकिकीकरण हे लोकनाटकाचे प्रमुख अंग असते. आपल्याकडील कृषी-संस्कृतीतील सुफलीकरणाचे विधी, देवदेवतांचे मखोटे घालून होणारे पंचमी, बोहडय़ाचे खेळ, काष्ठय़पांचालिका अथवा कळसूत्री बाहुल्यांचे खेळ या सर्वांचा अंतर्भाव लोकनाटकात करता येईल.

महाराष्ट्रातील भक्तीसंप्रदायाद्वारे आविष्कृत झालेल्या भक्तीनाटय़ापूर्वी आपणास यातुक्रिया किवा यावात्मक क्रियांमधून आविष्कृत झालेल्या विधिनाटय़ांचा विचार करावा लागेल. आदिवासी संस्कृती आणि ग्राम संस्कृतीत या विधीविधानांचे आपले एक विष्व असून बोहडा, पंचमी, गोंधळ, जागरण, भराड आदी विधिनाटय़ांनी मराठी लोकधर्मात आपला स्वतंत्र ठसा उमटविल्याचे निदर्शनास येते.

देवतावरण, देवतेचा संचार, देवतेच्या लीला, देवतेचे निर्गमन या लोकश्रद्धेतून विधिनाटय़ाची निर्मिती होते. ‘विधी’ नाटय़ात्म असतो म्हणून त्याला विधिनाटय़ म्हणायचे. कोकणातील दशावतार, खेळे, नाशिक-मालेगाव तसेच खान्देशातील काही भागातील भवाडा, मराठवाडय़ातील पंचमी, ही विधिनाटय़े म्हणजे देवतावताराची विविध रूपे होत.

प्रतिवर्षी गावात देव अवतरतो. हा देव मखोटय़ांच्या रूपाने पूजनीय असतो. गावातून या मखोटय़ांची वाद्यांच्या गजरात मिरवणूक निघते. काही ठिकाणी त्याला छबिना म्हणतात. लोक मोठय़ा श्रद्धेने या अवतरलेल्या देवाच्या पाया पडतात. त्याच्यापुढे दंडवत घालतात. त्याला साकडे घालतात. देवाचा कोप आणि देवाचा संतोष या धर्मश्रद्धेपोटी लोकमानसात या अवतरलेल्या देवाबद्दल एक भीतीयुक्त श्रद्धा असते. आखाडी, पंचमी, चैती अशा विविध नामाभिधानांनी लोकमानसात स्वतंत्र ठसा उमटविलेल्या या विधिनाटय़ात देवतेची सोंगे, देवतेचे मखोटे पूजनीय असतात.

खान्देशात भवाडा प्रचलित असून त्यात देवदेवतांची सोंगे सजवून रस्त्यावर आणतात. मशालीच्या प्रकाशातील ही सोंगे ठायी ठायी मिरवून नेतात त्यावेळी पदे व संवादही म्हणतात. ‘पंचमी’ हे विधिनाटय़ पूर्वरंग आणि उत्तररंगात सादर होते. सूत्रधार, त्याचे साथीदार, गणपती, सरस्वती, विदूषक अशी क्रमाक्रमाने सोंगे येत राहतात. जोगी, गोसावी, भाट, भगत अशा सोंगांनी अखंड रात्र जागविली जाते. म्हणूनच ‘रात्र थोडी सोंगे फार’ अशी स्थिती निर्माण होते. सामाजिक वैगुण्यांचा समाचार घेणारी काही लौकिक सोंगे हसता हसता नकळत चिमटे काढून जातात. दंभस्पह्ट हा लौकिक सोंगांचा प्रमुख उद्देश असतो. सत्यनारायणाची पूजा सांगणारा ब्राह्मण विष्णुसहस्त्र्ा नामात अन्य नावे कशी घुसडतो. मेंडशी जोशी खऱयाचे खोटे व खोटय़ाचे खरे करणारे भविष्यकथन कसे करतो, आंधळे, बहिरे, मुके हे यात्रेच्या ठिकाणी प्रत्यक्षात तसे व्यंग नसताना कसे यात्रेकरूंना लुबाडतात. या व अशा अनेक लौकिक सोंगांमधून दंभस्पह्ट केलेला आढळतो. पंचमीसारखे विधिनाटय़ असो अथवा लळितासारखे भक्तिनाटय़ असो ‘हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा’ हा भागवत, संप्रदायी संतांचा विचारच त्यातून दृष्टोत्पत्तीस येतो.

पंचमी, लळितासारख्या प्रयोगात्म लोकाविष्कारांचे स्वरूप दुपेडी असते. ’तुज मज नाही भेद केला सहज विनोद‘ असा संवाद भगवत भक्तांनी ईश्वराशी केला असल्याचे ईश्वराच्या संकीर्तनासोबत ईश्वराची सोंगे आणली जातात. ईश्वराशी सहज विनोद करताना मग श्रीगणेशाला ‘ढेरपोटय़ा’ अथवा सरस्वतीला ‘पिसं लावलेली काsंबडी’ म्हणण्याचे स्वाभाविकच स्वातंत्र्य भक्तांनी घेतलेले असते. गणपती, सरस्वती, ऋद्धी-सिद्धी या सोंगासोबतच भालदार, चोपदार, छडीदार अशी ईश्वर-उपासकांची सोंगे हा झाला धार्मिक भाग.

अभिजन विरुद्ध ग्रामजन, संपन्न विरुद्ध विपन्न, पाखंडी विरुद्ध सश्रद्ध, वैदिक कर्मकांडी विरुद्ध सगुणोपासक नामसंकीर्तनकार, नागरी विरुद्ध ग्रामीण अशा संवाद विरोधातून रात्रभर सोंगांच्या रूपाने सुरू असलेल्या पंचमी, लळिताने आज मात्र आपला चेहरामोहरा गमावला असल्याचे दिसत आहे. गावगाडा आणि गावगाडय़ाबाहेरील जगताचा सांस्कृतिक परिघ बदलल्याने या कला प्रकारांचे कालसंवादी स्वरूप लोप पावत चालले आहे. आज खेडय़ापाडय़ांतून लळित, पंचमी, बोहडा, भवाडा होत असेल; पण ते आपले सांस्कृतिक अवशेष आहेत असेच म्हणावे लागेल.

खंडोबा, अंबा, भवानी, रेणुका आदी शिव-शक्तीरूपातील विविध क्षेत्रपाल देवतांचे एक वेगळेच संस्कृती-परिमंडळ असून या देवदेवतांच्या विधिनाटय़ांनी आजवर लोकसंस्कृतीच्या चलनवलनात आपला चेहरामोहरा टिकवून ठेवला आहे. गोंधळ, जागरण, भराड आदी विधिनाटय़े आजही खेडय़ापाडय़ांतून व शहरांतूनही कुलाचारांसोबत सुस्थिर आहेत. खंडोबाचे जागरण, अंबेचा, रेणुकेचा गोंधळ व भैरवनाथाचे भराड लग्न, मुंजीसारख्या मंगलप्रसंगी करण्याचे कुलाचार, कुलधर्म आहे.

पाच उसांच्या मखरात प्रतीकात्मक देवदेवतांची स्थापना करून दीप, दिवटी पाजळून रात्रभर खंडोबाचे संकीर्तन जागरणाच्या रूपाने तर अंबा, रेणुकेचे संकीर्तन गोंधळाच्या रूपाने होते. वाघ्ये व मुरळय़ा हे खंडोबाचे उपासक तर कदमराई, रेणुराई गोंधळी हे अंबा भवानी व रेणुकेचे उपासक.

गोंधळी रेणुकापुत्र परशुरामाला पहिला गोंधळी मानतात. गोंधळ हा दक्षिण हिंदुस्थानातील अतिप्राचीन देशी नृत्यप्रकार असून त्यात लोकदेवतेचे व भगताचे उन्नयन होत गेले. संबळ, तुणतुणे, मंजिरी या वाद्यांच्या साथीने सादर होणाऱया गोंधळाचे दोन प्रमुख प्रकार होत. कदमराई गोंधळी म्हणजे तुळजापूरच्या भवानीचे उपासक आख्यानाचा गोंधळ सादर करतात. त्याला ‘हरदासी गोंधळ’ असेही म्हणतात. गण, गौळण, आख्यान, आरती असा कदमराई गोंधळय़ांनी सादर केलेल्या आख्यानाच्या गोंधळाचा आविष्कारक्रम असतो. रामायण, महाभारत, पुराणातील कथा आख्यानपर काव्याच्या रूपाने गोंधळी सादर करतात. चौका चौकांच्या पदांचे गायन, गायनातच मधूनच सपादणी, संवाद व निरूपण असे गोंधळाचे स्वरूप असते. कदंबांच्या काळापासून गोंधळ महाराष्ट्रात प्रचलित असून कोल्हापूर, माहूर, तुळजापूर, पुणे, सातारा, सांगली, मराठवाडय़ातील औरंगाबाद, परभणी, बीड आदी परिसरात रेणुराई व कदमराई गोंधळय़ांची परंपरागत घराणी आहेत. ‘गोंधळ’ या विधिनाटय़ाने प्रायोगिक रंगभूमीलाही समर्थ योगदान दिले आहे. गोंधळ हे विधिनाटय़ बाराव्या-तेराव्या शतकातही इतके लोकप्रिय होते, की भागवत -संप्रदायी संतांनी ‘गोंधळ’ हे विधिनाटय़ व ‘गोंधळी’ या लोकसंस्कृतीच्या उपासकांवर अनेक रूपके केली आहेत.

जागरण, गोंधळासारखेच ‘भराड’ हे विधिनाटय़ही पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ात सर्वपरिचित असून भैरवनाथाचे उपासक हे विधिनाटय़ सादर करतात; पण त्याचे स्वरूप विधिगीतांचे असते. नाटय़ाचा भाग अल्पांशाने असतो. भैरवनाथ, कानिफनाथ आदी शिव संप्रदायातील देवतांचे संकीर्तन भराडाद्वारे होते. डमरू, डौर ही वाद्ये भराडाची शिव संप्रदायाशी सांगड घालणारी आहेत. पंचमी, बोहाडा, आखाडी यासारखी संचारित नाटय़े, अभिचार-नाटय़े तसेच गोंधळ जागरणासारखी विधिनाटय़े आजही कालौघात टिकून आहेत. कारण विधिसंबद्धता आणि धर्मश्रद्धा यांचा या विधिनाटय़ांशी अतूट धागा असतो.

डक्कलवारांचे जातिपुराण, स्मशान जोडय़ांचे कथाकथन, चित्रकथींचे सचित्र कथाकथन, धनगरांचे सुंबरान, वासुदेव, पांगुळ यांचे गीत संकीर्तन या सर्वांचे कलाविश्व असते. आजही या लोकपरंपरा महाराष्ट्राला परिचित आहेत.

(लेखक लोककलेचे अभ्यासक आहेत)

z [email protected]