
मुंबईत या वर्षी ‘पीओपी’च्या मूर्तींना परवानगी असली तरी घरगुती आणि मंडळांकडून गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांकडे शाडूच्याच मूर्तीची मागणी करण्यात येत आहे. दरवर्षी ‘पीओपी’च्या मूर्ती बनवणाऱया मंडळांपैकी 15 ते 20 टक्के मंडळांनी आणि घरगुती उत्सवासाठी सर्वाधिक शाडूच्याच मूर्तीची मागणी करण्यात येत आहे. ‘पीओपी’ मूर्तीच्या विघटनाचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे पालिका आणि गणेशोत्सव समितीकडून पर्यावरणपूरक मूर्ती करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपल्याने गणेश चित्रशाळांमध्ये सध्या मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. गेली सलग दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने उत्सव अत्यंत साधेपणाने निर्बंध पाळून साजरा करण्यात आला. मात्र या वर्षी कोरोनाचे संकट नसल्याने गणेशोत्सव धूमधडाक्यातच साजरा होणार आहे. दरम्यान, ‘पीओपी’च्या मूर्तींना या वर्षापुरती परवानगी असल्याने मंडळे आणि घरगुती उत्सवासाठी कोणत्या मूर्ती घेणार असा सवाल निर्माण झाला होता. यामध्ये आता घरगुती आणि मंडळांकडूनही या वर्षीपासूनच पर्यावरणपूरक मूर्तीला पसंती देण्यात येत असल्याचे गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.
या वर्षीची नियमावली
मुंबईत सुमारे बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सक मंडळे आहेत. तर सवादोन लाख घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. या वर्षापुरती पालिकेने ‘पीओपी’च्या मूर्तींना परवानगी दिली आहे. शिवाय उंचीचीदेखील मर्यादा नाही. मात्र घरगुती मूर्ती दोन फुटांचीच करावी असे आवाहन पालिकेने करताना ‘पीओपी’ची मूर्ती असल्यास नैसर्गिक स्थळांवर विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ या वर्षासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना नैसर्गिक जलाशय-तलाव, समुद्रात मूर्तीच्या विसर्जनाची परवानगी राहणार आहे. शिवाय पर्यावरणपूरक मूर्तींचीच खरेदी करावी, असे आवाहनही पालिकेकडून करण्यात आले आहे.
आमच्या गणेश चित्रशाळेतील 26 मोठय़ा मूर्तींपैकी केवळ चार ते पाच मूर्ती ‘पीओपी’च्या आहेत. उर्वरित सर्व मूर्ती मागणीनुसार शाडू-कागदाच्या लगद्यापासून बनविण्यात आल्या आहेत. शिवाय बहुतांशी घरगुती मूर्ती या शाडूच्याच आहेत.
– राजन झाड, मूर्तिकार, डिलाईल रोड
‘पीओपी’च्या मूर्तींना पुढील वर्षीपासून बंदी असली तरी या वर्षीपासून भाविकांकडून शाडूच्या मूर्तीची मागणी होत आहे. आमच्याकडे असणाऱया 400 घरगुती मूर्तींपैकी सर्वाधिक मूर्ती शाडूच्याच आहेत. पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी वाढत आहे.
– नीळकंठ राजम, मूर्तिकार, घाटकोपर पूर्व


























































