गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त! नोंदणी शुल्क, हमीपत्राची अट शिथिल; मूर्तीच्या उंचीवर बंधन नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर आता आगामी गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम या सणांवरील निर्बंध शिंदे-फडणवीस सरकारने उठविले आहेत. गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाइन व एक खिडकी योजनेंतर्गत देण्यात येतील तसेच मूर्तीच्या उंचीवरही बंधन नसेल. शिवाय मंडळांची नोंदणी शुल्क, हमीपत्राची अट शिथिल करण्याची घोषणा आज सरकारकडून करण्यात आली.

सार्वजनिक गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. गेली दोन वर्षे आपण कोरोनाच्या सावटाखाली होतो, त्यामुळे सण उत्साहाने साजरे करता आलेले नाहीत. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, दहीहंडी हे सण उत्साहाने, जल्लोषात साजरे व्हावेत यासाठी राज्य शासनामार्फत गणेशोत्सव मंडळांना सहकार्य करण्यात येईल. सर्व मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच समाज प्रबोधन, सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम या सणाच्या काळात राज्यामधील कायदा व सुव्यवस्था उत्तम राहील या दृष्टीने पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

पीओपी मूर्तींच्या निर्णयासाठी तांत्रिक समिती

पीओपीच्या मूर्तींबाबत निर्णय घेण्यासाठी एक तांत्रिक समिती नियुक्त केली जाणार असून त्यामध्ये एमपीसीबी, निरी, आयआयटी, एनसीएल आदी संस्थांचे तज्ञ प्रतिनिधी असतील. ही समिती पर्यावरणपूरक मार्ग काढेल.

दहीहंडीत न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन

  • दहीहंडी उत्सव साजरा करताना न्यायालयाने लहान गोविंदाबाबत न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • गणेशोत्सव मंडळांना नवीन नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा देण्याबरोबरच नोंदणी शुल्क माफ करण्याचे तसेच गणेशोत्सव काळात पोलीस विभागाकडून घेण्यात येणारे हमीपत्र घेण्याची आवश्यकता नाही.
  • संपूर्ण राज्यभर उत्सवासाठी एक नियमावली राहील. तसेच जिल्हा प्रशासनांनी उत्सवासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश.
  • गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवरील ध्वनीप्रदूषण तसेच इतर काही गुन्हे नोंदवले असतील तर मागे घ्यावेत अशा सूचना.

यंदा मूर्तीच्या उंचीवर कोणतेही बंधन राहणार नाही. मूर्तिकारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. मुंबईतील मूर्तिकारांना मूर्तिशाळांसाठी जागा निश्चित करण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याबरोबरच मूर्तिकारांसाठी असलेल्या काही जाचक अटी व शर्ती शिथिल करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.

गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी राज्यभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही तातडीने करावी. याबरोबरच कोकणात जाण्यासाठी पुरेशा प्रमाणात एस. टी. बसेस उपलब्ध करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. शिवाय गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्यांच्या वाहनांना टोलमाफीची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.