भक्तांचा महापूर, दिवा स्थानकात रेकॉर्डब्रेक गर्दी

बाप्पाच्या स्वागतासाठी ‘गावाक्’ जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांचा आज दिवा स्थानकात अक्षरशः ‘मोरया’ झाला. केंद्र आणि राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार आणि गणपती स्पेशल गाड्यांचे कोलमडलेले वेळापत्रक यामुळे दिवा स्थानकात प्रचंड गर्दी झाली. जागा पकडण्यासाठी अनेकांनी आपल्या पोराबाळांसह थेट ट्रकवर उतरत विरुद्ध दिशेने ट्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे तुफान रेटारेटी झाली. या झटापटीत अनेकांच्या सामानाच्या बॅगाही गाडीतून खाली पडल्या. मध्य रेल्वेच्या या ‘मरे’ कारभाराचा  फटका बसलेल्या ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील हजारो गणेशभक्तांनी हा जीवघेणा प्रवास करत गावच्या दिशेने कूच केली.

खड्डय़ांमुळे वाटोळे झालेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून दणकेबाज प्रवास करण्याऐवजी अनेक जण ट्रेननेच कोकणातील आपले गाव गाठतात. मात्र गणेशभक्तांचा सुखकर प्रवास करण्याच्या सरकारच्या घोषणा हवेतच विरल्याचे चित्र ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकावरील झालेल्या तुफान गर्दीवरून समोर आले आहे.

चाकरमान्यांसाठी शासनाकडून दिवा जंक्शन येथून विनारक्षित मेमू ट्रेन सुरू केली आहे. ही मेमू ट्रेन रोज सकाळी 7 वाजता दिवाहून रत्नागिरीच्या दिशेने रवाना होते. मात्र या मेमू ट्रेनसाठीदेखील मोठय़ा प्रमाणात गर्दी उसळली. या ट्रेनमध्ये चढण्यासाठी चाकरमान्यांनी प्रचंड रेटारेटी केली. फलाटावर आणि विरुद्ध दिशेला ट्रकवर उतरत प्रवाशांनी गाडीत चढण्यासाठी जीवघेणी कसरत करत होते. हीच अवस्था ठाणे स्थानकातही होती. राज्य परिवहन सेवेच्या म्हणजेच एसटी महामंडळाच्या लालपरीसाठीदेखील कोकणवासीयांच्या बसथांब्यांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

रेल्वेचा भोंगळ कारभार; कोकण प्रवासात 16 तास रखडपट्टी, चाकरमान्यांचे हाल