रेल्वेचा भोंगळ कारभार; कोकण प्रवासात 16 तास रखडपट्टी, चाकरमान्यांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे आज प्रचंड हाल झाले. रेल्वेकडून कोकण मार्गावर चालवल्या जाणाऱ्या नियमित गाड्यांबरोबरच गणपती विशेष गाड्या तब्बल चार-पाच तास विलंबाने धावत होत्या. त्यामुळे रात्री गाडीत बसलेल्या प्रवाशांना कोकणात पोहोचायला तब्बल पंधरा ते सोळा तास लागले. गाडीत अन्न, पाणी नसल्याने लहान मुलाबाळांसह वृद्धांची मोठी गैरसोय झाली. सकाळी कोकणात पोहोचणाऱ्या गाड्यांना दुपार झाल्याने चाकरमान्यांना स्थानकातून पुढे आपले घर गाठताना सायंकाळ झाली. त्यामुळे प्रवाशांकडून रेल्वेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात होता.

दादर-सावंतवाडी तुतारी एक्प्रेस, जनशताब्दी, कोकणकन्या, नेत्रावती या एक्प्रेस गाड्या तब्बल दोन ते अडीच तास विलंबाने कोकणात पोहोचल्या.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी ही गाडी मध्यरात्री 1.20 वाजता सुटणारी गाडी तब्बल तीन तास उशिराने सुटली. त्यामुळे कुटुंबकबिल्यासह कोकणात निघालेल्या चाकरमान्यांची रात्रभर सीएसएमटी स्थानकात लटकंती झाली. सीएसटी-मडगाव, लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगलोर या गाडय़ही जवळपास दोन तास उशिराने सुटल्याने प्रवाशांना स्थानकातच बसून राहावे लागले.

या विशेष गाड्यांना लेटमार्क

सीएसएमटी-सावंतवाडी या एक्प्रेसची नियोजित वेळ मध्यरात्री 12.20 असतानाही तब्बल तीन तास उशिराने म्हणजे पहाटे 3.09 वाजता सुटली आणि कणकवली येथे साडेचार तास उशिराने म्हणजे दुपारी अडीच वाजता पोहोचली.

एसएमटी-मडगाव ही सकाळी 11.50 वाजता सुटणारी गाडी  दोन तास उशिराने सुटल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.

लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगलोर ही गाडी पाऊण तास उशिराने म्हणजे मध्यरात्री 12 वाजता सुटलेली असतानाही सावंतवाडी येथे चार तास लेट म्हणजे सकाळी 11.30 वाजता पोहोचली.

एलटीटी-कुडाळ ही गाडी मध्यरात्री पावणेएक वाजता वेळेत सुटलेली असतानाही सिंधुदुर्गला चार तास उशिराने म्हणजे दुपारी दोन वाजता पोहोचली.

सकाळी सात वाजता सुटलेली दिवा-रत्नागिरी, शनिवारी सायंकाळी सात वाजता सुटलेली दिवा-चिपळूण या गाड्या अडीच तास उशिराने पोहोचल्या.

पुण्याहून पनवेलमार्गे करमाळीला जाणारी एक्प्रेस गाडी वेळेत सुटली होती, पण सिंधुदुर्गला पोहोचायला तब्बल सहा तास विलंबाने म्हणजे पहाटे 6 वाजताची वेळ असताना 12 वाजता सिंधुदुर्ग येथे पोहोचली.

भक्तांचा महापूर, दिवा स्थानकात रेकॉर्डब्रेक गर्दी

हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम एक्प्रेस वसईला आलीच नाही

उत्तरेकडून येणारी हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम ही गाडी वसई, पनवेलहून पुढे कोकणात जाते. सदरची गाडी दुपारी दोन वाजता वसई स्थानकात येणे अपेक्षित होते, मात्र पश्चिम रेल्वेच्या गोध्रा-रतलाम विभागात प्रचंड पाऊस सुरू असल्याने रेल्वे रुळाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलले असून नागदा, भोपाळ, इटारसी, जळगाव मार्गावरून पुढे कल्याण, पनवेल अशी वळवली आहे. त्यामुळे गाडी वसई स्थानकात येणार म्हणून येथे आलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रेल्वेकडून सदर गाडीचा मार्ग बदलला असल्याने प्रवाशांनी कल्याण किंवा पनवेल स्थानकात पोहोचावे अशी उद्घोषणा केली खरी, पण अर्धा-एक तासात पोहोचणे शक्य नसल्याने अनेकांची गाडी सुटली.

नियम धाब्यावर, रेल्वेचे नमो नमो!

मध्य रेल्वेने आज नियम धाब्यावर बसवत नमो, नमो करतानाच भाजपच्या नावाचा जप केला. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यासांठी भाजपने दादर स्थानकातून विशेष रेल्वे गाड्या सोडल्या आहेत. पूर्ण भाडे भरून आरक्षित केलेल्या अशा गाड्यांची रेल्वेकडून नियमानुसार ‘विशेष गाडी’ असा उल्लेख करत उद्घोषणा करणे आवश्यक आहे. मात्र आज सकाळी सवा नऊच्या सुमारास गाडी सुटताना रेल्वेकडून नियम धाब्यावर बसवत  ‘भाजपची नमो’ ट्रेन अशी उद्घोषणा वारंवार केली जात होती. एखाद्या राजकीय पक्षाचे नाव घेऊन होणारी अशाप्रकारची उद्घोषणा प्रथमच कानावर पडल्याने प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. याबाबत रेल्वेकडे विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

मध्य रेल्वेबरोबरच पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दीडशेहून अधिक गाड्या चालवल्या जात आहेत. मात्र सदरच्या गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

एर्नाकुलम एक्प्रेस गाडी वसई स्थानकात शनिवारी रात्री वेळेत आली खरी, पण प्रचंड गर्दीमुळे  चाकरमान्यांची गैरसोय झाली. स्लीपरचे तिकीट असतानाही अनेक प्रवासी डब्यात चढता न आल्याने बाहेरच राहिले. तसेच एसी डब्यात प्रवाशांनी घुसखोरी केली होती.

शौचालयातले पाणी संपले, प्रवाशांची कुचंबणा

मुंबईतून सुटलेल्या एक्प्रेस गाड्या नऊ-दहा तासांत कोकणात पोहोचणे अपेक्षित होते. मात्र गाड्यांना चार-पाच तासांचा लेटमार्क लागल्याने गाडीच्या डब्यात असलेले पाणी संपल्याने शौचालयास जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच कुचंबणा झाली.