
महाराष्ट्राचा महोत्सव असलेला गणेशोत्सव सातासमुद्रापार पोहोचला असून मुंबईप्रमाणेच मॉस्कोतदेखील बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. तेथील बाप्पाच्या विधिवत स्वागतासाठी मुंबईकर गुरुजीही रशियाला निघाले आहेत. मॉस्को येथे गेल्या 12 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.
मुंबईतील काळाराम मंदिरातील गुरुजी सिद्धेश मणेरीकर हे गिरगावातील रहिवासी आहेत. सार्वजनिक गणपती बाप्पासोबतच गुरुजी मॉस्कोमध्ये राहणाऱ्या पांडे कुटुंबाच्या घरगुती बाप्पाचीदेखील प्राणप्रतिष्ठा करतात. विदेशात बाप्पाची मूर्ती उपलब्ध होत नसल्याने गुरुजी स्वतः गिरगावच्या मांदुस्करांकडून घडवलेली मातीची गणेशमूर्ती विमानाने घेऊन मॉस्कोत पोहोचतात आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी पांडे कुटुंबियांच्या घरी बाप्पाची रीतसर प्राणप्रतिष्ठा करतात. या काळात रोज सकाळी आणि सायंकाळी आरती, पूजा, 56 भोग नैवेद्य आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष ‘लिमोजिन बस’ आणि 60 ते 70 लक्झरी गाड्यांचा ताफा काढला जातो. मॉस्को नदीत क्रूझवर 2 तास बाप्पाची मिरवणूक काढून प्रतीकात्मक मूर्तीचे जलविसर्जन केले जाते.


























































