नगर-पुणे महामार्गावर वाहनचालकांना चाकूच्या धाकाने लुटणारी टोळी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर-पुणे महामार्गावर वाहनचालकांना अडवून चाकूचा धाक दाखवत लुटमार करणाऱया चौघाजणांच्या टोळीला नगर तालुका पोलिसांच्या पथकाने बुधवारी (दि.20) पहाटे चास शिवारात सापळा लावून पकडले आहे. त्यांच्याकडून लुटीतील 2 मोबाईल, लोखंडी सुरा, 27 हजार 500 रुपयांची रोकड व 1 दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

आकाश सुभाष सोलाट (वय 22) व अक्षय राजू साळवे (वय 24, दोघे रा. सारोळा कासार, ता. नगर) यांना अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नगर-पुणे महामार्गावर चास-कामरगाव शिवारात नेहमीच रात्रीच्या वेळी वाहनचालकांना लुटण्याच्या घटना होत असतात. या लुटारूंच्या टोळीला पकडण्यासाठी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी कंबर कसली होती. त्यानुसार बुधवारी (दि.20) पहाटे 1 टोळी चास शिवारात असल्याची माहिती सानप यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथकासह जाऊन सापळा लावला. थोडय़ाच वेळात चौघेजण संशयास्पदरीत्या दुचाकीवरून जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना पकडून त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांनी थोडय़ा वेळापूर्वीच एका ट्रकचालकाला लुटल्याची कबुली दिली. तसेच, 16 जून रोजी रात्री 11.30 च्या सुमारास चास शिवारातच पीकअपचालक लक्ष्मण राजू रसाळ (रा. हडपसर, पुणे) याला धमकावत त्यांच्याजवळील 30 हजारांची रोकड व दोन मोबाईल लुटले होते. त्याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. हा गुन्हाही आपणच केल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे.

आरोपींकडून लुटीतील दोन मोबाईल, लोखंडी सुरा व 27 हजार 500 रुपयांची रोकड तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी हस्तगत केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली.