
पुणे शहरातील खडकी परिसरातील एका ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन दुचाकी, कोयता, चाकू, मिरची पूडसह एकूण एक लाख 16 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. गुरुवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
अल्तमेश शब्बीर कुरेशी (वय 20), तोहिद शब्बीर शेख (वय 19) , सुमित राजेश पिल्ले (वय 25, सर्व रा. खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार तरुण सुरेश पिल्ले (वय 25, रा. खडकी ) यालाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकीतील सुपर एक्स क्वॉर्टर्समागील मोकळ्या जागेत काहीजण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली. त्यांच्याकडे तीन दुचाकी, कोयता, चाकू, मिरचीपूड आढळले. याप्रकरणी खडकी पोलीस अधक तपास करीत आहेत.





























































