गँगस्टरला पकडण्यासाठी पोलिसांचा हनी ट्रॅप! लग्न ठरवलं आणि ठोकल्या बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका गँगस्टरला पकडण्यासाठी पोलिसांनी हनी ट्रॅपची मदत घेतल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. महिला पोलिसाने या प्रकरणात प्रमुख भूमिका बजावली असून या आरोपीला लग्नाच्या सापळ्यात अडकवत बेड्या ठोकल्या आहेत.

मध्य प्रदेशच्या छतरपूर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून एक कुख्यात गुंड फरार होता. बालकिशन असं या गुंडाचं नाव असून तो हत्या आणि दरोड्याच्या 15 प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी होता. पण, पोलिसांना चकवून तो दरवेळी फरार होत होता. अखेर पोलिसांनी त्याला अडकवण्यासाठी मोहिनी अस्त्राचा प्रयोग केला. कारण अतिशय धोकादायक असला तरी बालकिशन स्त्रीलंपट असल्याने पोलिसांनी त्याच्या याच वृत्तीचा फायदा उचलण्याचं ठरवलं.

पोलीस निरीक्षक माधवी अग्निहोत्री या धाडसी महिलेने फेसबुकवरून बालकिशनशी संपर्क साधला. तिथेच त्याचा नंबर मिळवून आपलं नाव राधा लोधी असल्याचं त्याला सांगितलं. आपण छतरपूरच्या असून आता दिल्लीत मजुरीचं काम करतो, असंही तिने त्याला सांगितलं. मोबाईल क्रमांकावर काही दिवस चॅटिंग केल्यानंतर बालकिशनने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तिने होकार देताच त्याने तिला भेटायला बोलावलं आणि उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेजवळील एका मंदिरात भेट ठरली.

भेटीवेळी गुलाबी रंगाचे कपडे घालून येत असल्याचं राधा उर्फ माधवी हिने बालकिशनला सांगितलं. त्यानुसार, मंदिराच्या जवळ पोहोचल्यानंतर त्याने गुलाबी कपड्यातल्या राधाला ओळखलं आणि तो तिच्या दिशेने सरसावला. त्याचवेळी तिथे लपून बसलेल्या पोलिसांनी धाव घेत त्याच्यावर झडप घातली आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.