खर्डीच्या ठाकूरपाडय़ात ‘गंगा’ अवतरली

सामना ऑनलाईन । खर्डी

आडोशाला धरण असूनही खड्डय़ातले गढूळ पाणी पिणाऱ्या ठाकूरपाडय़ाच्या अंगणी अखेर ‘गंगा’ अवतरली आहे. वैतरणा धरण पात्रातून पाइपलाइनद्वारे या पाडय़ात पाणी पोहोचले असून त्यामुळे येथील अदिवासी महिलांची तीन किलोमीटरची पायपीट थांबली आहे.

मोडकसागर धारणालगत असणाऱ्या ठाकूरपाडा या आदिवासी पाडय़ावर ६० घरे असून ३०० च्या आसपास लोकवस्ती आहे. पाडय़ात दोन विहिरी व एक कुपनलिका आहे. मात्र फेब्रुवारीतच पाणी तळ गाठत असल्याने येथील महिलांना तीन किलोमीटर अंतरावरील खोल दरीत उतरून डबक्यातून पाणी आणून तहान भागवावी लागते. गढूळ पाण्यामुळे येथील आदिवासींचे आरोग्यही धोक्यात आले आहे. धरण उशाला असतानाही पाण्यासाठी आदिवासी महिलांची होणारी ही जीवघेणी धडपड पाहून जिल्हा परिषदेचे शिक्षक सचिन सारंगधर व शिवसेनेचे शाखाप्रमुख, टेंभा ग्रामपंचायतीचे उपसरपंच एकनाथ कोर यांनी पाणी टंचाई कायमची दूर करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी सावली संस्थेच्या माध्यमातून महिंद्र लॉजिस्टिक या कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मदतीसाठी आवाहन केले. या आवाहनाला महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीने चांगला प्रतिसाद देत येथे 25 लाख रुपयांची नळपाणी योजना राबवली.

वैतरणाचे पाणी
गावात २० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली असून दीड किलोमीटरवरून वैतरणा धरण पात्रातून पाइपलाइनद्वारे पाणी आणण्यात आले आहे. ही सर्व योजना राबवण्यासाठी सावली संस्थेचे शांताराम माने आणि प्रतिभा पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. याशिवाय आमदार पांडुरंग बरोरा, ग्रामविकास आघाडीचे प्रमुख अनिल घोडकिंदे, टेंभा ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका आमले, पंचायत समिती सदस्य दत्ता हंबीर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश आमले, आनंद रोज, महिंद्रा लॉजिक्सचे पवार, ग्रामसेवक वेखंडे, गणेश धपाटे व स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले.