कोरोना लसीसंदर्भातील सर्वात मोठी बातमी, मानवी चाचणी यशस्वी झाल्याचा जर्मन कंपनीचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघं जग सध्या कोरोना नावाच्या महामारीशी झुंजत आहे. अनेक देशांमध्ये कमी झालेली कोरोनाची लाट पुन्हा येत आहे. याच दरम्यान कोरोना लसीसंदर्भात एक मोठी बातमी येत आहे.

सध्या जगभरात 150हून अधिक कोरोना लसींवर काम सुरू आहे. लवकरात लवकर लस मिळावी यासाठी जगभरातले शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. दरम्यान, जर्मनीतील एका बायोटेक कंपनीने असा दावा केला आहे की कोरोनावरील त्यांच्या लसीची मानवी चाचणी यशस्वी झाली आहे.

या लसीच्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यातील माहितीच्या आधारे त्यांनी हा दावा केला आहे. क्युअरवॅक नावाची ही कंपनी गेल्या काही महिन्यांपासून कोरोनावर लस बनवत होती. त्यांच्या कोविड लसीच्या पहिल्या टप्प्याच्या चाचणीवेळी तब्बल 250 जणांवर ही चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यात महत्त्वपूर्ण बदल झाल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे.

या चाचणी करून घेणाऱ्या स्वयंसेवकांच्या शरीरातील अँटिबॉडीजचं प्रमाण हे जवळपास कोरोनाच्या गंभीर स्थितीतील रुग्ण बरे झाल्यावर निर्माण होणाऱ्या अँटिबॉडीजइतकं होतं. आता ही कंपनी 2020च्या डिसेंबरपासून या लसीची मोठ्या प्रमाणातील मानवी चाचणी करण्याचं योजत आहे. जर या लसीची पुढील मानवी चाचणी यशस्वी झाली तर लवकरात लवकर त्याचं उत्पादन करून ती निर्यात करता येईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

या लसीचे काही साईड इफेक्टही दिसून आले आहेत. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार लसीकरणानंतर अनेक जणांमध्ये थकवा, डोकेदुखी, पेशींमध्ये वेदना आणि काहींना तापही आले. मात्र, 24 ते 48 तासांत ही लक्षणे दूर झाली असं कंपनीचं म्हणणं आहे.