
चार वर्षांपूर्वी घाटकोपर येथील साईसिद्धी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेला मुख्य आरोपी सुनील शितप याचा मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
एक लाखाच्या जातमुचलक्यावर न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी शितप याची सुटका केली. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयात खटला सुरू होण्यास विलंब झाल्याचे निरीक्षणही हायकोर्टाने नोंदवले आहे.
25 जुलै 2017 रोजी घाटकोपर येथे झालेल्या इमारत दुर्घटनेत एकूण 17 लोकांचा नाहक बळी गेला. याप्रकरणी आरोपी सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे इमारतीच्या नूतनीकरणाचे काम करणारे कॉण्ट्रक्टर, आर्पिटेक्ट यांनाही सहआरोपी करण्यात आले होते.
याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आरोपी सुनील शितपचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने तसेच हायकोर्टाने यापूर्वी फेटाळून लावले होते. त्यानंतर शितपने हायकोर्टात पुन्हा जामिनासाठी अर्ज केला. न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावर आरोपीच्या वतीने बाजू मांडताना वकिलांनी सांगितले की, शितपला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून त्यापैकी 3 वर्षे त्यांनी तुरुंगात काढली आहेत. तसेच सत्र न्यायालयात खटला सुरू होण्यास विलंब झाल्याची बाब लक्षात घेत हायकोर्टाने शितप याचा सशर्त जामीन मंजूर केला.


























































