
मेट्रोच्या वाढत्या जाळय़ामुळे मुंबईतील वाहतुकीचा वेग वाढणार असला तरी आता मेट्रो ट्रेनही बंद पडायला सुरुवात झाली आहे. आज सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळीच घाटकोपर-वर्सेवा मार्गावर धावणारी मेट्रो सेवा असल्फा स्थानकात वीज पुरवठा करणाऱया यंत्रणेत बिघाड झाल्याने जवळपास पाऊण तास ठप्प होती. त्यामुळे मेट्रोच्या गारेगार प्रवासाचा अनुभव घेणाऱया मुंबईकरांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. लोकल ट्रेनप्रमाणे मेट्रोही बेभरवशाची झाली तर काय, असा सवाल प्रवाशांसमोर उभा राहिला आहे.
घाटकोपर-वर्सेवा मार्गावर धावणाऱया मुंबई मेट्रो वनने दररोज लाखो मुंबईकर प्रवास करतात. सध्या तापमानाचा पारा वाढलेला असल्याने अनेकजण मेट्रो प्रवासाला पसंती देत आहेत. लोकल ट्रेनच्या तुलनेत प्रवाशांच्या पसंतीला उतरलेली मेट्रो आज सायंकाळी 4.45 वाजता वीज पुरवठा करणाऱया यंत्रणेत बिघाड होऊन ठप्प झाली. त्यामुळे वाहतुकीचा जवळपास पाऊण तास खोळंबा झाल्याने एकामागोमाग गाडय़ांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, मेट्रो कर्मचाऱयांनी तत्काळ धाव घेत वीज पुरवठा करणारी यंत्रणा पूर्ववत केल्याने 5.30 वाजता मेट्रो पुन्हा सुरू झाली. मात्र ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो सेवा बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अनेक स्थानकांत प्रवाशांनी मेट्रोला बाय-बाय करत रिक्षा-टॅक्सीला पसंती दिली. मेट्रो सेवा ठप्प झाल्याने अनेक प्रवाशांनी मुंबई मेट्रो वनला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले.
अंधेरी, चकाला, घाटकोपर स्थानकांत गर्दी
मेट्रो गर्दीच्या वेळीच बंद पडल्याने अंधेरी, चकाला, डी. एन. नगर, घाटकोपर या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. मेट्रो 2 अ आाणि 7 या मेट्रोने दहिसरहून आलेले अनेक प्रवासी गुंदवलीत उतरून चकाला स्थानकातून पुढे घाटकोपरच्या दिशेने प्रवास करतात. पण पाऊण तास गाडीच नसल्याने चकाला स्थानकात गर्दी उसळली.




























































