
सामना ऑनलाईन । मुंबई
आम्ही राहतो त्याच ठिकाणी आमचे पुनर्वसन झाले पाहिजे या मागणीवर आम्ही ठाम असून मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने (एमएमआरसीएल) तशी लेखी हमी द्यावी अशी मागणी प्रस्तावित ‘मेट्रो-3’ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गिरगावकरांनी केली आहे. मेट्रोमुळे बाधित होणाऱ्या 439 रहिवाशांची आज गिरगावच्या क्रांती नगरात बैठक झाली. त्यामध्ये राहत्या जागीच घरे मिळाली पाहिजेत असा निर्धार रहिवाशांनी केला.
गिरगावमधील क्रांती नगरासह सूर्यमहल, चंद्रमहल, न्यू चंद्रमहल, तारामहल, अन्नपूर्णा निवास, ठाकूरद्वार शेड, विठ्ठलदास, स्वामी निवास, श्रीराम भवन आदी इमारतींमधील नागरिक या बैठकीत सहभागी झाले होते. या रहिवाशांनी आपल्या समूहाला ‘जी-3’ असे नाव दिले आहे. त्याअंतर्गत आजची बैठक बोलवण्यात आली होती.
या मेट्रोबाधितांच्या पुनर्वसनासाठी जी-1, जी-2 आणि जी-3 असे तीन टॉवर्स उभारण्यात येतील असे एमएमआरसीएलने सांगितले होते, परंतु आता फक्त जी-3 हा एकच 50 मजली टॉवर उभारला जाईल असे सांगितले जात आहे. आश्चर्य म्हणजे या टॉवरमधील घरांची संख्या आणि प्रत्यक्षात करार केलेल्या रहिवाशांची संख्या यात मोठी तफावत आहे अशी माहिती रहिवाशांनी दिली.
29 एप्रिलला मेट्रो महामंडळाने बोलावली बैठक
एमएमआरसीएलने रहिवाशांच्या ज्या मागण्या मंजूर केल्या त्याची माहिती अधिकृत वेबसाइटवर जाहीर करावी, बांधण्यात येणाऱ्या टॉवरमध्ये किती घरे आणि ती किती चटई क्षेत्रफळाची असतील याचा खुलासा करावा आणि जी-3 टॉवरमध्येच आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. दरम्यान यासंदर्भात एमएमआरसीएलने 29 एप्रिल रोजी रहिवाशांची बैठक बोलवली असल्याचे समजते.
























































