तरुणीने प्रियकराच्या मदतीने जुन्या प्रियकराची केली हत्या, कारण ऐकून व्हाल अवाक

गुवाहाटीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीने प्रियकराच्या साथीने आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराची हत्या करुन पळण्याच्या तयारीत असलेल्या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. अंजली शॉ आणि विकास शॉ आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 42 वर्षीय संदीप हा पुण्यातील कार डीलर होता. अंजलीचे त्याच्याशी प्रेमसंबंध होते. अंजली कोलकाता विमानतळावर एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होती आणि विकास नावाच्या व्यक्तीसोबत तिचे आधीपासून प्रेमसंबंध होते. अंजलीसोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतरही संदीप तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. अंजलीने विकासला संदीप आणि तिच्या खासगी फोटोंबाबत सांगितले. यानंतर दोघांनी संदीपच्या फोनमधून ते फोटो कसे डिलीट करता येतील यासाठी कट रचला. योजनेनुसार अंजलीने संदीपला फोन करून 4 फेब्रुवारी रोजी गुवाहाटी येथे बोलावले, तेथे त्याने तिच्यासाठी हॉटेलची खोलीही बुक केली. त्याच हॉटेलमध्ये विकासने वेगळी खोलीही बुक केली. संदीप हॉटेलवर पोहोचल्यावर विकास आणि अंजली समोरासमोर आले. त्यावेळी अंजलीचे खासगी फोटो डिलीट करण्यासाठी संदीपकडून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर झटापटी झाली. ज्याच संदीप बेशुद्ध झाला. विकास आणि अंजली घाबरून घटनास्थळावरून पळून गेले.

हॉटेल कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासांतच विकास आणि अंजलीला पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी अडीचच्या सुमारास विकास आणि संदीप यांच्यात हाणामारी झाली. विकास आणि अंजलीला संदीपचा मोबाईल हवा होता, त्यात अंजली आणि संदीपचे खासगी फोटो होते. या हाणामारीत संदीपला दुखापत होऊन तो बेशुद्ध झाला. नंतर त्याचा मृत्यू झाला. हॉटेल कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, पाहुण्यांची यादी तपासली आणि सायंकाळी 6.30 वाजता विमानतळाकडे निघालेल्या जोडप्याला अटक केली. दोघेही 9.15 च्या फ्लाइटने कोलकात्याला पळून जाण्याच्या तयारीत होते.