गोव्यात लवकरच राजकीय भूकंप! गोवा फॉरवर्डचे चार आमदार शिवसेनेच्या संपर्कात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर आता गोव्यातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गोव्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले. गोव्यातही भाजपने अनैतिक पायावर आधारलेले सरकार स्थापन केले आहे. महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे नेते सुधीर ढवळीकरांशी आपली चर्चा झाली आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख विजय सरदेसाईंसह चार आमदार शिवसेनेच्या संपर्कात असून भाजपसोबत गेलेले काँग्रेसचे आमदारही आमच्या सोबत येण्यास तयार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.गोव्यात आलेले भाजप सरकार लोकांना आवडलेले नाही. त्यामुळे त्यांचे सरकार लवकरच धोक्यात येईल. फक्त गोव्यातच नाही तर देशभरात भाजपविरोधात आघाडी उघडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोव्यातील पक्षीय बलाबल
गोवा विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 13 आणि काँग्रेसला 17 जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी 3, गोवा फॉरवर्ड पार्टी 3 तर राष्ट्रवादी एका तर 3 जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. रातोरात 10 काँग्रेस आमदार भाजपात सामील झाले आणि भाजपच्या जागा 27 झाल्या आहेत.