गोव्यात शुक्रवारी पावसाचा रेड अलर्ट; पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शुक्रवार-शनिवारी सुट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवा हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी 8 जुलै रोजी उत्तर आणि दक्षिण गोव्यात 1-2 ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवत रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शुक्रवार 8 जुलै आणि 9 जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. हवामान विभागाने मच्छिमारांना 5 दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

गोव्यात उद्या हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याशिवाय 9 आणि 10 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे.

सक्रिय मॉन्सून आणि मध्यप्रदेश आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे तसेच पश्‍चिम किनारपट्टीवरील ‘ऑफशोर टर्फ’ अशा पावसासाठीच्या पुरक स्थितीमुळे राज्यात रविवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.

गेल्या 24 तासांत हंगामातील सर्वात जास्त 156.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा हा गेल्या पाच वर्षांतील विक्रम आहे. दक्षिण गोव्यातही जोरदार सरी कोसळत असून कुशावती नदीला पूर आला आहे.