युवा पिढी सुदृढ होण्यासाठी गोवर- रुबेला लसीकरण महत्वाचे – के. मंजुलक्ष्मी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी ।  सिंधुदुर्गनगरी

देशाची भावी पिढी सुदृढ होण्यासाठी गोवर रुबेला लसीकरण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी येथे केले. सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये आज जिल्हास्तरीय गोवर – रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्यासह पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिश जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, आरोग्य विभागाचे राज्यस्तरीय निरिक्षक डॉ. शिंदे, जागतीक आरोग्य संघटनेचे डॉ. खरनारे, मुख्य लेखा अधिकारी गौतम जगदाळे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. आंबोकर, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी पी.आर.चव्हाण. गट विकास अधिकारी विजय चव्हाण, पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, डॉन बॉस्को हायस्कूलचे प्रिन्सिपॉल फादर क्लाईव्ह टेलिस आदींसह जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोवर-रुबेला लसीकरणाचे कोणतेही दुष्परीणाम नसल्याचे सांगून के. मंजुलक्ष्मी पुढे म्हणाल्या की, सर्व पालकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा. आज येथे मी अधिकारी म्हणून नाही तर पालक म्हणून आलेले आहे. माझ्या मुलांनाही मी ही लस देणार आहे. त्यामुळे या लसिबाबात पालकांनी कोणतीही भिती बाळगू नये असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी या लसीकरणण मोहिमेविषयी माहिती दिली. तर डॉन बॉस्को हायस्कूलचे प्रिन्सिपल फादर टेलिस यांनी लसीकरणणाचे महत्व उपस्थितांना सांगितले.

यावेळी मुख्य कार्याकारी अधिकारी के.मंजुलक्ष्मी यांची मुलगी मिनाक्षी, मुलगा निलमाधवन, पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची मुलगी रितीका, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांची मुलगी मृणाल यांना गोवर – रुबेलाची लस देण्यात आली.

सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.

या लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील दीड लक्ष लाभार्थ्यांना गोवर-रुबेलाची लस देण्यात येणार आहे.