
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. त्यामुळे देशातील अन्य प्रश्नांकडे लक्ष देण्यास केंद्रीय मंत्र्यांना वेळच नाही अशी परिस्थिती आल्याचे पाहायला मिळत आहे. खुद्द केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे देखील प्रचारात व्यस्त असल्याने मंत्रालयातील अनेक गोष्टींकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील अत्यंत महत्वाची अशी बैठक देखील निवडणूक प्रचार कार्यक्रमामुळे होऊ शकलेली नाही.
इंग्रजी वृत्तपत्र द इंडियन एक्सप्रेसमध्ये छापून आलेल्या एका लेखात दिलेल्यानुसार, देशातील महिलांची सुरक्षा अधिक बळकट करण्यासंदर्भात 24 ऑक्टोबर रोजी (GoM-Group of Minister) एक समिती नेमण्यात आली होती. याची अध्यक्षता राजनाथ सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे. तर संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी असे या समितीचे सदस्य आहेत. ही समिती नेमण्यात आल्यानंतर अद्याप एकही बैठक होऊ शकलेली नाही. कारण निवडणुकांमुळे राजनाथ सिंह यांच्यासह समितीमधील प्रमुख सदस्य हे प्रचार सभांमध्ये अडकले आहेत. गंभीरबाब म्हणजे महिला सुरक्षेचे अवलोकन करण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी उपाय सुचवण्यास फक्त तीन महिन्यांची मुदत मिळाली आहे. त्यामधील एक महिन्यात बैठकही न झाल्याने मोदी सरकार महिला सुरक्षेच्या मद्द्याकडे किती गांभीर्याने बघते, हे स्पष्ट होत आहे. आता या समितीकडे अत्यंत कमी वेळ उरला आहे.



























































