करवंटी, सुपारीच्या पानांपासून वस्तू; वेंगुर्ल्यातील हस्तकलेची देशी-विदेशी पर्यटकांना भुरळ

ग्रामीण भागात पूर्वी चांदवड, चारोळी, वड यांसारख्या पानांच्या पत्रावळी तयार करून जेवणासाठी वापरल्या जायच्या. हे नैसर्गिक ताट प्रत्येकाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारे होते. मात्र कालौघात त्याची जागा प्लॅस्टिक, थर्माकोलसारख्या पत्रावळींनी घेतली आणि पर्यावरण समस्या निर्माण झाली.

थर्माकोल, प्लॅस्टिकसारख्या अविघटनशील वस्तूंच्या वापरामुळे देशात एक मोठी समस्या निर्माण होऊ लागली आहे. मात्र याला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक वस्तू तयार करण्याचा यशस्वी व्यवसाय वेंगुर्ले तालुक्यातील परुळे आजारवाडी येथील प्रथमेश नाईक यांनी केला आहे. सुपारीच्या पानांपासून आकर्षक लहान-मोठय़ा डिश, ताट वेगवेगळय़ा आकाराचे चमचे, नारळाच्या करवंटीपासून तयार केलेले टिकाऊ कप, बाऊल, शोपीस देशी-विदेशी पर्यटकांना चांगलेच भावले आहे. त्यांनी तयार केलेल्या या वस्तू अमेरिका, इंग्लंड, कॅनडा देशांसह महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, केरळ राज्याच्या टोकापर्यंत प्रसिद्धीस पावल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिह्याचा पर्यटनाच्या बाबतीत देशातच नाही, तर जागतिक स्तरावर नावलौकिक आहे. येथील जैवविविधता, लोककला, संस्कृती पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. येथील स्थानिक माणसात उपजत कलागुण दडलेले असतात. नाईक यांनी आपल्या कलेला व्यवसायाची जोड दिली आहे. त्यांनी आपल्या बागेतील शेतमांगराची दुरुस्ती करून एक पक्की व्यावसायिक इमारत उभारली आहे. मागील दहा वर्षांपासून सावंतवाडी, कुडाळ तालुक्यांतील स्थानिक शेतकरी बागायतदारांकडून लहान-मोठय़ा आकाराची सुपारीची पाने खरेदी करत त्यांनाही उचित मोबदला मिळवून दिला. साधारण ऑक्टोबरपासून मे महिन्यापर्यंत हा टाकाऊ माल गोळा करून आपल्या बागेत सुकवून तो गोडाऊनमध्ये व्यवस्थितरीत्या साठवून ठेवायचा आणि वर्षभर त्यातून विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्याचे विकसित तंत्र नाईक यांनी जोपासले. येथीलच दोघा स्थानिकांना सोबत घेतल्यामुळे त्यांनाही आपला हक्काचा रोजगार मिळाला आहे. सध्या जलद कामकाज व्हावे यासाठी हायड्रोलिक मशीनचा काही प्रमाणात वापर केला जात आहे. तीन वर्षांपूर्वी नारळाच्या करवंटीला नाईक यांनी हस्तकौशल्याची जोड देत दीर्घकाळ टिकणाऱया सुंदर वस्तूंची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.

जाहिरातीची गरज नाही
सिंधुदुर्गात दाखल होणारे पर्यटक रिसॉर्ट, कृषी पर्यटन केंद्र, होम स्टेवर विश्राम करतात. येथील पर्यटन व्यावसायिक त्यांना नाश्तापासून जेवणापर्यंत नाईक यांच्या जवळील पर्यावरणपूरक वस्तूंचा आवर्जून वापर करतात. यावेळी पर्यटकांकडून हमखास विचारणा होते आणि विविध वस्तूंच्या मागणीची भर पडते. प्रथमेश नाईक आपल्या इकोफ्रेंडली वस्तूंची कोणतीही जाहिरात करत नाहीत. मात्र फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून त्यांची कला सर्वदूर पसरली आहे. यामुळे मुंबई, पुणे व इतर शहरांत होणाऱया प्रदर्शनासाठी तेथील व्यावसायिक त्यांच्या या पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली वस्तूंची खरेदी करून प्रदर्शनात मांडतात.
स्वप्नील साळसकर