गुगलचा वाटाडय़ा प्रदूषणविरहित रस्ते दाखवणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुगल मॅप म्हणजे आजच्या आधुनिक युगातील वाटाडय़ा. प्रवासात कुठलाही नवीन रस्ता शोधायचा म्हटलं की आपण सर्वात आधी गुगल मॅपची मदत घेतो. आजवर ट्रफिकमुक्त किंवा शॉर्टकट रस्ते दाखवणारे गुगल मॅप लवकरच युजर्सना प्रदूषणविरहित रस्ते दाखवणार आहे. या वर्षाच्या अखेरीस हे फिचर अमेरिकेत लाँच होणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर देशांमध्ये सुरू होईल.

वाहनांमुळे होणाऱया प्रदूषणाची समस्या गंभीर असल्याने गुगलने हे फिचर लाँच करणार आहे. इकोफ्रेंडली किंवा ज्या रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे प्रदूषण नसेल असे रस्ते या नवीन फिचरमध्ये गुगल मॅप दाखवणार आहे. मात्र असे रस्ते दाखवताना युजर आपल्या इच्छितस्थळी कमी वेळेत पोहोचेल याचीदेखील काळजी घेतली जाणार आहे. या ऍपमध्ये गाडय़ांच्या संख्येबरोबरच रस्त्यांवरील चढउतार, खड्डे, खराब रस्ते याचीही माहितीही भविष्यात दिली जाईल. याखेरीज गुगलचे ऋतुमान आणि हवेची गुणवत्ता सांगणाऱया फिचरवरही काम सुरू आहे.

रस्त्यांवरील प्रदूषण सर्वात धोकादायक
वाहनांमधून निघणारा सल्फर डायऑक्साईड श्वसनाच्या विकारांसाठी खूपच धोकादायक आहे. कफ आणि सतत खोकला या विषारी वायूमुळे होतो.
नायट्रोजन ऑक्साईड या वायूमुळे ज्वाराबरोबर लढण्याची क्षमता कमी होते. सातत्याने या वायूच्या संपर्कात राहिले तर लहान वयातच दमा जडण्याची शक्यता असते.
कार्बन मोनोक्साईडमुळे मेंदू आणि हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. पेट्रोलमधील शिशामुळे लहान मुलांची मानसिक वाढ खुंटते. शिशाचे कण श्वसनामार्फत सहज फुप्फुसांमार्फत पोहोचतात.