गोरखपूरचा मोस्ट वॉण्टेड विनोद उपाध्याय एन्काऊंटरमध्ये ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरखपूरचा मोस्ट वॉण्टेड विनोद उपाध्याय एसटीएफच्या एन्काऊंटरमध्ये ठार झाला. आज शुक्रवारी पहाटे सुलतानपूर जिह्यात एसटीएफने विनोद उपाध्यायला घेराव घातला. यावेळी त्याने एसटीएफचा घेरा तोडून जाण्याचा प्रयत्न केला तसेच पोलीस पथकाच्या दिशेने अनेक राऊंड गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल एसटीएफने केलेल्या गोळीबारात विनोदला गोळी लागल्याने तो जखमी झाला. एसटीएफने त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विनोद उपाध्यायवर एक लाख रुपयांचे बक्षीस होते. एसटीएफ, गोरखपूर गुन्हे शाखा आणि पोलीस सुमारे सात महिन्यांपासून त्याच्या मागावर होते. 2007 मध्ये उपाध्यायने गोरखपूरमधून बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, मात्र त्याचा पराभव झाला होता. पहाटे साडेतीन वाजता डेप्युटी एसपी दीपक सिंह यांच्या टीमसोबत उपाध्यायची चकमक उडाली. देहात कोतवाली भागात झालेल्या या चकमकीत उपाध्यायला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला.