गोवर- रुबेला लसीकरण मोहिमेस जिल्‍ह्यात सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

शहर आणि जिल्‍हयात आजपासून गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेस शुभारंभ झाला. जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेत जिल्‍हयातील 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना लस दिली जाणार आहे. त्‍यासाठी जिल्‍हा प्रशासन आणि आरोग्‍य यंत्रणेने नियोजन केले असून त्‍याप्रमाणे ही मोहिम राबविली जाणार आहे.

या कार्यक्रमास महानगरपालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त विलास वालगुडे, जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. पी एम मुरंबीकर, वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, मनपाचे प्रशासन अधिकारी संजय मेहेर, लायन्‍स क्‍लबचे हरजितसिंग वधवा, लक्ष्‍मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्‍यमिक विद्यालयाचे विश्‍वस्‍त ज्ञानदेव पांडळे, प्राचार्य अरविंद काकडे, प्राथमिकचे मुख्‍याध्‍यापक शिवाजी लंके आदी उपस्थित होते.

गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेची आजपासून सुरुवात होत आहे. नगर शहर व कटक मंडळ भिंगार कार्यक्षेत्रामध्‍ये मोहिमेच्‍या आयोजनाकरीता लस टोचकांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. सुरुवातील सर्व शाळेतील मुलांना लस देण्‍यात येणार असून त्‍यानंतर संबंधीत नागरी आरोग्‍य केंद्र, अंगणवाडया व उर्वरीत लाभार्थ्‍याना लसीकरण करण्‍यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन जानेवारी 2019 च्‍या पहिल्‍या आठवडयापर्यत करण्‍यात आले असून यामध्‍ये 1 हजार 196 सत्रांद्वारे जवळपास 1 लाख 25 हजार 670 लाभार्थ्‍याना या मोहिमेमध्‍ये लसीकरण करण्‍यात येणार आहे. तोफखाना, मुकूंदनगर, केडगाव, नागापूर, महात्‍मा फुले, नवीपेठ, जिजामाता नागरी आरोग्‍य केंद्र, कै. बाळासाहेब देशपांडे दवाखाना, जिल्‍हा रुग्‍णालय, कॅन्‍टोनमेंट रुग्‍णालय भिंगार इत्‍यादी लसीकरण केंद्रात लस देण्‍यात येणार आहे. अधिक माहितीसाठी आरोग्‍य विभाग मुख्‍य कार्यालय महानगरपालिका नगर (दूरध्‍वनी क्र. 0241-2324823) तसेच तुमच्‍या नजिकच्‍या आरोग्‍य सेविका, आशाताई अथवा अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधावा.