कर्नाटकातील राजकीय पेच वाढला; बहुमतासाठी राज्यपालांनी दिलेली मुदत संपली

50
hd-kumarswamy

सामना ऑनलाईन । बंगळुरू

कर्नाटकातील राजकीय नाट्य गेल्या 15 दिवसांपासून सुरू आहे. मात्र, त्यावर कोणताही तोडगा दृष्टीपथात नाही. काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी दिलेली मुदत शुक्रवारी 1.30 वाजता संपली आहे. त्यामुळे हा पेच आणखी वाढला आहे. कर्नाटक विधानसभेचे कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची शक्यता कमीच आहे. काँग्रेस-जेडीएस आघाडी बहुमत सिद्ध करण्यापासून पळत आहे आणि ते वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

राज्यपालांच्या आदेशानुसार शुक्रवारी दुपारपर्यंत बहुमत सिद्ध करणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना राज्यपाल विधानसभा अध्यक्षांना आदेश देऊ शकतात काय, असा सवालही त्यांनी केला. आता राज्यपालांनी दिलेली मुदत संपल्याने पेच आणखी वाढला आहे. आता राज्यपालांना परिस्थितीत हस्तक्षेप करून केंद्राच्या निर्णय घेऊन पुढील प्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र, अधिवेशन सुरू असताना राज्यपाल आदेश देऊ शकत नाहीत, असे जेडीएस-काँग्रेस आघाडीकडून अरुणाचल प्रदेशच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा हवाला देत सांगण्यात येत आहे.

भाजपने रात्रभर विधानसभेत धरणे आंदोलन करून बहुमत सिद्ध करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सरकार बहुमत सिद्ध करण्याची शक्यता कमी आहे. आघाडी सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. कुमारस्वामी यांनी विधानसभेत केलेल्या भाषणात पदाचा राजीनामा देण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाही. त्यामुळे कर्नाटक नाट्याला काय वळण लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या