राज्यपाल कोश्यारींनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केलं; राष्ट्रपती-पंतप्रधानांनी निर्णय घेण्याची वेळ – शरद पवार

sharad-pawar-koshyari

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल त्यांनी अद्यापही माफी मागितलेली नाही. तर सत्ताधाऱ्यांनी देखील त्यांची पाठराखण केल्याचंच पाहायला मिळत आहे. अशा वेळी विरोधक मात्र आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राज्यपालावर जोरदार टीका केली आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांनी राज्यपालांना लक्ष्य केलं. राज्यपाल हे एक संस्थात्मक पद आहे. त्याची प्रतिष्ठा ठेवायची असते त्यामुळे यापूर्वी यावर कुणी बोललं नाही. पण शिव छत्रपतींच्या संदर्भातील त्यांनी केलेला उल्लेख पाहिल्यानंतर विद्यमान राज्यपालांनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केलं आहे, असं पवार म्हणाले. काल त्यांनी छत्रपती शिवरायांचं कौतुक केलं, पण ते महाराष्ट्रात झालेल्या आंदोलनांनंतर उशिरा सूचलेलं शहापण असल्याचा सणसणीत टोलाही पवार यांनी लगावला. आता यासंदर्भात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी काय तो निर्णय घेतला पाहिजे, असेही पवार यावेळी म्हणाले. अशा व्यक्तीकडे अशा जबाबदाऱ्या दिल्या नाही पाहिजे, असेही ते म्हणाले.

खासदार उदयन राजे यांनी केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की, मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी हे विधान केलं. त्यामुळे पदवी न घेण्याचा वैगरे काही संबंध त्यावेळी आला नाही.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर राज्यपाल कोश्यारी हे दिल्लीतील उच्चपदस्थांची भेट घेण्यासाठी आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासंदर्भात दिल्लीत काही निर्णय होतो का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.