
मंगळ ग्रहाचा रंग लाल आहे. मंगळावरची माती आणि दगडाचा रंगदेखील लाल आहे. मात्र तिथे हिरव्या रंगाचा चमकदार दगड आढळल्याने वैज्ञानिक अवाक् झाले आहेत. ‘नासा’ने मंगळावर पाठवलेल्या पर्सिव्हरेन्स रोव्हरने हा दगड टिपला आहे. मंगळावर रहस्यमय दगड कुठून आला, तो कशापासून तयार झाला हे अद्याप समजलेले नाही. दगडावर लहान छिद्रे आहेत. तसेच मधे हिरव्या रंगाची क्रिस्टलसारखी वस्तू आहे. त्यावर प्रकाश पडल्यास ती चमकते.
पर्सिव्हरेन्स रोव्हरने आपल्या ट्विटर हॅण्डलवर लिहिलंय, इंज्युनिटी हेलिकॉप्टर मंगळ ग्रहावर उतरल्यानंतर आमच्या पथकाला हा दगड आढळून आला. त्याचे फोटो रोव्हरवर लावलेल्या वेगवेगळ्या कॅमेऱयांतून घेतले आहेत. सध्या केवळ आमच्याकडे अंदाज आहेत. जोपर्यंत रोव्हर तपास करत नाही तोपर्यंत ठोस काही सांगता येणार नाही.
मंगळावर सापडलेला हिरवा दगड 15 सेंमी लांब आहे. त्यावर लेझर मार्क आहेत. हा दगड मंगळ ग्रहाच्या लोकल बेडरॉकचा भाग आहे, तर मग याचा रंग असा कसा? एकतर हा दुसऱया ग्रहावरून आलाय किंवा एखाद्या उल्कापिंडाचा तुकडा आहे याबाबत शास्त्रज्ञ हैराण आहेत.


























































