
सामना प्रतिनिधी । कराड
यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी एकत्र जावून त्यांना शुभेच्छा दिल्या. अरुणा ढेरे यांच्या पुणे येथील निवासस्थानी चव्हाण व पाटील यांनी जावून त्यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याचे कौतुकदेखील केले. त्यांच्यासोबत माजी आमदार उल्हासदादा पवार, नगरसेवक आबा बागुल उपस्थित होते.
कराडच्या चव्हाण व पाटील या दोघा सुपुत्रांनी त्यांचा सत्कार केल्यानंतर तेथे जुन्या आठवणी, साहित्य क्षेत्रातील प्रत्येकाचा व्यासंग यासह विविध चर्चाही रंगल्या. अरुणा ढेरे यांच्या रुपाने एका प्रख्यात साहित्यिकास अध्यक्षपदाचा मान मिळाला. यवतमाळमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये तेथीलच भूमिपुत्र असणाऱ्या अरुणा ढेरेंची अध्यक्षपदी निवड ही खरोखरच अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया आ. चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.































































