दोन महिने राजकीय विश्रांती घेतल्यानंतर ‘शिवशक्ती’ यात्रेच्या माध्यमातून भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी राजकारणात पुनरागमन केले. मात्र, त्यांच्या ‘शिवशक्ती’ला ‘महाशक्ती’ची नजर लागली असून जीएसटी थकविल्याच्या कारणावरून वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने सहा महिन्यांपूर्वी धाड टाकून कागदपत्रांची झाडाझडती घेतली होती. यावेळी 19 कोटी रुपयांचा जीएसटी थकीत असल्याचे समोर आले होते. या कराच्या वसुलीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी आयुक्तालयाने वैद्यनाथ कारखान्याला वारंवार नोटिसा बजावल्या. मात्र, कारखान्याकडून जीएसटी आयुक्तालयाला समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे आज मोठय़ा पोलीस बंदोबस्तात जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याचे बॉयलर हाऊस आणि इतर मशिनरी अशी एकूण 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. या मालमत्तेचा लिलाव करून हा कर वसूल करण्यात येणार आहे.
नेमके प्रकरण काय आहे
कोरोनाच्या काळात वैद्यनाथ साखर कारखान्यात तयार झालेली साखर व्यापाऱ्यांना विकण्यात आली. मात्र, त्यावरील जीएसटीचा भरणा करण्यात आला नाही. कारखान्यातून विक्री होणाऱ्या साखरेवरचा जीएसटी प्रत्येक महिन्याला भरावा लागतो. परंतु, कोरोनाकाळातील 19 कोटींचा जीएसटी थकीत राहिला. यासंदर्भात कारखान्याला नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. परंतु, या नोटिसांना कारखान्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
‘शिवशक्ती’ यात्रेमुळेच ही कारवाई- बच्चू कडू
पंकजा मुंडे यांनी ‘शिवशक्ती’ यात्रा काढली. यात्रेच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोहोचल्या. त्यामुळेच त्या अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेवर जप्तीचा वरवंटा फिरविण्यात आल्याचा स्पष्ट आरोप प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.































































