नाशिकमध्ये नाकाबंदी दरम्यान स्फोटकांचा साठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नाशिक

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी दरम्यान नाशिकमधील जायखेडा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील चिचली घाटात मोठ्या प्रमाणात जिलेटीनच्या कांड्या व डिटोनेटरचा साठा जप्त केला आहे. हा स्फोटकांचा साठा एका पिकअप गाडीतून गुजरातच्या दिशेने नेला जात होता. या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी पिकअप गाडी आणि गाडीच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.

जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंग यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य सीमेवर नाकाबंदी करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्यानुसार जायखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत चिचलीबारी येथे नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. यादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या पथकाला मुल्हेर कडून गुजरातकडे जाणारी महिंद्रा पिकअप गाडी भरधाव वेगाने जाताना दिसली. पोलिसांनी या गाडीला अडवून तपासणी केली असता त्यात तब्बल 2150 जिलेटिनच्या कांड्या आणि 1750 डिटोनेटर विनापरवाना असल्याचे आढळून आले. पोलिसांनी पिकअप चालक भवरलाल  गुर्जर (28) राहणार राजस्थान याला ताब्यात घेतले आहे. तर त्याचा साथीदार बुध्दलाल गुजर हा पळून गेला. त्यांच्या विरुद्ध भारतीय स्फोटक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.