बंदुकीची गोळी लागल्यावर माणूस कसा काय मरतो? वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील अत्यंत प्राणघातक अशा शस्त्रांमध्ये बंदूक या शस्त्राचा समावेश होतो. अन्य कोणत्याही धारदार, अवजड शस्त्रांच्या तुलनेने उचलायला आणि वापरायला सोपी, तितकीच प्राणघातक सुद्धा.

बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर ती सहज चालवता येते. शत्रूचा दुरूनच वेध घेता येतो. ही चालवण्यासाठी फार ताकद लागत नाही आणि तिचा परिणामही जलद आणि प्रभावी होतो. त्यामुळेच इतर कोणत्याही शस्त्राच्या तुलनेने हे शस्त्र जास्त लोकप्रिय झालं.

पण, या बंदुकीचा वार मात्र तितकाच घातक असतो. बंदुकीची गोळी लागून माणूस गंभीर जखमी होतो आणि त्याला मृत्यू येतो. पण बंदुकीची गोळी शरीरात घुसल्यानंतर नेमकं असं काय होतं, ज्यामुळे माणसाचा जीव जातो? या प्रश्नावर कोरा मराठी या संकेतस्थळावर उत्तर देण्यात आलं आहे.

बंदुकीचा प्रकार, त्याच्या गोळीचा आकार आणि वेग यांचा यात खूप महत्त्वाचा सहभाग असतो. गोळी अत्यंत वेगाने शरीरात घुसते. ती ज्या भागात शिरते, तिथल्या रक्तवाहिन्या फाटतात आणि रक्तस्राव सुरू होतो.

तो अवयव देखील या गोळीमुळे फुटतो किंवा त्याला गंभीर इजा होते. त्यातून रक्तस्राव सुरू होतो. हा रक्तस्राव वेळीच थांबवला नाही, तर माणसाची स्थिती गंभीर होऊ शकते. अतिरक्तस्राव झाला तर माणसाचा मृत्यु ओढवतो. बऱ्याचदा गोळी हृदय किंवा मेंदू अशा मुख्य अवयवांमध्ये लागते. त्यामुळे या अवयवांचं शरीरावरचं नियंत्रण जातं. त्यामुळे देखील मृत्यू होऊ शकतो.

कधी कधी या गोळीमुळे झालेल्या जखमा सडू लागतात आणि माणसाची स्थिती गंभीर होऊन तो दगावतो. तर कधी कधी शरीरात घुसलेली गोळी रक्तवाहिन्यांना फारशी इजा न पोहोचवता तशीच अडकून राहतो. ती शस्त्रक्रिया करून काढली जाते.