
सामना ऑनलाईन । कोल्हापूर
कोल्हापुरातील एका सरपंचाने उत्साहाच्या भरात गोळीबार करून त्याचा व्हिडीओ बनवणे त्याच्या अंगलट आले आहे. शशिकांत ऊर्फ भाऊ खवरे असे या सरपंचाचे नाव असून ते हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची गावात त्यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेत गोळ्या झाडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खवरे यांनी नियमांचे उल्लंघन करून डबल बॅरल बंदूक आणि रिव्हॉल्वरने भर रस्त्यात गोळीबार केल्याने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची या गावचे सरपंच शशिकांत खवरे यांनी बुधवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी पुजनाच्या निमित्ताने आपल्याकडील रिव्हॉल्वर आणि एका बंदुकीतून हवेत फैरी झाडल्याचा व्हिडीओ व्हॉट्सपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. भर रस्त्यात अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन गोळीबार केल्या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिसांनी खवरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडील दोन्ही शस्त्रे जप्त केली आहेत. खवरे यांच्याकडे दोन्ही शस्त्रांचे परवाने आहेत. मात्र त्यांनी शस्त्र हाताळण्याच्या नियमांचे उल्लंघन करून रिव्हॉल्वरमधुन 3 गोळ्या आणि बंदुकीतुन दोन गोळ्या हवेत झाडल्या आहेत. या प्रकरणी अधिक तपास शिरोली एमआयडीसी पोलीस करत आहेत.


























































