
सामना प्रतिनिधी । नगर
लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या पारनेर तालुक्यातील पिपळगावरोठा येथील ब वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा गुरुपौर्णिमा (आषाढ पौर्णिमा) उत्सव मंगळवार दि १६ जुलैला आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त खंडोबा पालखी व स्वामी गगनगिरी महाराज प्रतिमा यांची संयुक्त मिरवणूक काढण्यात येणार आहे.
पौर्णिमेला सकाळी ६ वाजता श्री खंडोबा मंगलस्नान, मूर्ती साजशृंगार, अभिषेक पुजा होईल, सकाळी 8 वाजता महाआरती होईल. नंतर होम हवन व यज्ञ होईल. सकाळी ९ वाजता खंडोबा देवाची पालखी व स्वामी गगनगिरी महाराज प्रतिमा यांची शाही रथातून मिरवणूक निघून ती कोरठण गडाला प्रदक्षिणेसाठी प्रस्थान करील. मिरवणुकीत जय मल्हार विद्यालयाचे दिंडी पथक, ग्रामस्थ व भाविक यामध्ये सहभागी होतील. ढोल ताशाच्या गजरात लेझीम खेळत ‘सदानंदाचा येळकोट’चा जयघोष करत भांडारा-खोबरे उधळत व स्वामी गगनगिरीचा जयघोष करत प्रदक्षिणा करतील. या वेळी हजारो भाविक भक्ताचे पालखी दर्शन व ओलांडा दर्शन होईल, नंतर पालखी मंदिरात परत येईल .
मंदिर प्रदक्षिणा करून पालखी पुन्हा मंदिरात आल्यानंतर १० वा. देवस्थानाजवळ स्वामी लोकेशानंदजी महाराज (आंबेगव्हाण) यांचे प्रवचन होईल. सभामंडप व पहिला मजला हॉलच्या बांधकामासाठी देणगी दिलेल्या देणगीदारांचा देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे.
दुपारी १२ पासून मारूती चिमाजी गुंजाळ (बेल्हे, जि. पुणे) यांच्यावतीने उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात येईल. देवस्थानतर्फे पिण्याचे पाणी, दर्शन व्यवस्था, पार्किंग आदींचे नियोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात चांगला पाऊस झाला असून निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
सर्व भाविक भक्तांनी या उत्सवातील कुलदैवताचे देवदर्शन, पालखी सोहळा, महाप्रसाद पंगत याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान तर्फे अॅड. पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सरचिटणीस महेन्द्र नरड, खजिनदार हनुमंत सुपेकर, विश्वस्त मनिषा जगदाळे, अश्विनी थोरात, किसन धुमाळ, चंद्रभान ठुबे, अमर गुंजाळ, दिलीप घोडके, किसन मुंढे, साहेबा गुंजाळ आदींनी केले आहे.

























































