
परराज्यातून गुटख्याचा साठा मागवून तो शहरात बेकायदेशीरपणे वितरीत करणारा आणि त्यातून जोरदार कमाई करणारा राजेश शेट्टीयार याला गुन्हे शाखेने बेडय़ा ठोकल्या. शहरातील गुटखा सप्लाय करणाऱया टोळीचा तो म्होरक्या आहे. या कारवाईमुळे गुटख्याचा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱयांचे धाबे दणाणले आहेत. विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल अपहरण व मारहाणीच्या गुह्यात शेट्टीयारवर अटकेची कारवाई करण्यात आली.
जितू सरकार या तरुणाने 8 मे रोजी राजेश शेट्टीयार, तानाजी खोपडे आणि शौकत अली या तिघांविरोधात अपहरण व मारहाणीची विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी 18 तारखेला तानाजीला पकडले, तर जूनच्या शेवटच्या आठवडय़ात शौकत गजाआड झाला, मात्र या दोघांचा बॉस आणि शहरात गुटखा सप्लाय करणारा म्होरक्या राजेश शेट्टीयार फरार होता. तो शीव येथे येणार असल्याची खबर मिळताच गुन्हे शाखेच्या सीआययू आणि युनिट-5च्या पथकाने राजेशला पकडले.
महाराष्ट्रात गुटखा आणि पान मसाला विक्रीवर बंदी आहे, मात्र तरीदेखील राजेश परराज्यातून गुटखा मुंबईत मागवून घेतो. बॉर्डरवर किंवा शहरात गुटख्याचा कंटेनर आल्यानंतर भाडय़ाने टेम्पो करून गुटखा तो शहरात वितरीत करतो. तानाजी आणि शौकत हे दोघे राजेशसाठी काम करायचे. 2020 पर्यंत जितूदेखील राजेशसाठी काम करायचा, पण लॉकडाऊनमध्ये राजेशच्या या गोरखधंद्याला खीळ बसल्याने जितूने हे काम सोडले. त्यानंतर तो पोलिसांचा खबऱया बनला आणि त्याने राजेशचे गुटख्याने भरलेले टेम्पो पकडून देण्यास सुरुवात केली.जितूमुळे आपले नुकसान होऊ लागल्याने राजेशने कट रचला आणि जितूला विक्रोळीला बोलावले. जितू तेथे गेल्यानंतर तानाजी आणि शौकतने त्याला मारहाण केली. दोघांच्या तावडीतून सटकल्यानंतर जितूने विक्रोळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती.


























































