मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदला क्लीन चिट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार, जमात उद दावा आणि लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफीज सईदला हिंदुस्थानातील अनेक दहशतवादी हल्ल्यांना आर्थिक रसद पुरवण्याच्या आरोपातून लाहोर उच्च न्यायालयाने क्लीनचिट दिला आहे. सईदसह अन्य सहा दहशतवाद्यांची दहशतवादविरोधी न्यायालयाने दिलेली शिक्षा रद्द केली आहे. दहशतवादी हल्ल्यांना आर्थिक मदत पुरवण्याच्या आरोपाखाली सर्वांना 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद असून त्याची जमात उद दावा ही संघटना धार्मिक मदतीच्या नावाखाली दहशतवाद पोसण्याचे काम करते. जमात उद दावामार्फत मिळालेल्या आर्थिक मदतीतून लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी 2008 साली म्बुंईवर दहशतवादी हल्ला केला होता. यात 166 जण निरपराध माणसे मारली गेली होती. याप्रकरणी पाकिस्तानमधील पंजाब पोलिसांच्या सीटीडी विभागाने या सर्वांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर लाहोरच्या दहशतवादीविरोधी न्यायालयाने त्यांना 6 महिन्यांची शिक्षा सुनावली होती. त्याचबरोबर दावाच्या निधीतून बनवलेल्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. मात्र लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुहम्मद अमीर भाटी आणि न्यायाधीश तारिख सलीम शेख यांच्या खंडपीठाने दहशतवादविरोधी न्यायालयाने दिलेला निकाल रद्द केला. सईदसह इतर सहा दहशतवाद्यांविरोधात आरोप सिद्ध करण्यात तक्रारकर्ते अपयशी ठरले. त्यामुळे शिक्षा रद्द करत त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.