मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद भोगतोय 78 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा; संयुक्त राष्ट्राची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावाचा अध्यक्ष हाफिज सईद पाकिस्तानमध्ये 78 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे, अशी माहिती पीटीआयने संयुक्त राष्ट्रांच्या हवाल्याने दिली आहे. दहशतवादाला आर्थिक मदत करणाऱ्या सात प्रकरणांमध्ये त्याला शिक्षा झाली आहे.

डिसेंबर 2008 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 1267 अल-कायदा प्रतिबंध समितीने जागतिक दहशतवादी म्हणून नियुक्त केलेला सईद पाकिस्तान सरकारच्या ताब्यात आहे, 12 फेब्रुवारी 2020 पासून तो 78 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. सात दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणांमध्ये दोषी ठरल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं पीटीआयनं म्हटलं आहे.

डिसेंबर 2023 मध्ये, हिंदुस्थानने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित दहशतवादी हाफिज सईदचं प्रत्यार्पण करण्यास सांगितलं, जो अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये हिंदुस्थानच्या तपास यंत्रणांना हवा आहे.

प्रतिबंध समितीनं असंही नमूद केलं आहे की, ‘लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा संस्थापक सदस्य हाफिज अब्दुल सलाम भुट्टावी आणि सईदचा सहायकाचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दूजोरा मिळाला आहे’.