रेल्वेखाली कापलेला हात ‘प्लॅस्टिक सर्जरी’ने पुन्हा जोडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

पालिकेच्या कूपर रुग्णालयात एका तरुणाचा रेल्वेखाली कापला गेलेला हात प्लॅस्टिक सर्जरीने पुन्हा जोडण्यात आला आहे. यामध्ये मध्यरात्री 1 वाजता सुरू केलेली अवघड शस्त्रक्रिया तब्बल सात तासांनंतर पूर्ण झाली. शस्त्रक्रियेनंतर आता संबंधित रुग्णाच्या हातामध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहेत.

काही दिकसांपूर्वी आपल्या वैयक्तिक कामासाठी गुजरातमधून मुंबईत आलेला 28 वर्षीय धर्मेंद्र रात्री साडेनऊच्या सुमारास अंधेरी स्टेशनवर रेल्वेतून पाय घसरून खाली पडला. या दुर्दैवी अपघातात रेल्वेच्या चाकाखाली आल्याने उजव्या दंडापासून पूर्णपणे वेगळा झालेला धर्मेंद्रचा हात त्याच्या एका मित्राने सुरक्षितपणे प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवला. तर रेल्वे पोलिसांच्या मदतीने धर्मेंद्रला अंधेरी स्टेशनपासून जवळ असलेल्या पालिकेच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वसाधारण रुग्णालया’त दाखल करण्यात आले. यामध्ये हात धडापासून पूर्णपणे वेगळा झाला असल्यामुळे डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. आता सुमारे महिनाभराच्या उपचारानंतर धर्मेंद्रच्या हातात सकारात्मक बदल दिसून येत असल्याचे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी सांगितले. धर्मेंद्र पुन्हा एकदा स्वत:च्या हाताने काम करू शकेल, असा विश्वासही डॉ. गणेश शिंदे यांनी व्यक्त केला आहे. कूपर रुग्णालयातील ‘प्लॅस्टिक सर्जन’ डॉ. नितीन घाग यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांच्या चमूने ही शस्त्रक्रिया केली. अशा दुर्घटनांमध्ये तातडीने शस्त्रक्रिया होणे गरजेचे असते. अन्यथा अवयव निकामी होण्याची शक्यता असते.

कुटुंबाला पुन्हा ‘आधार’ मिळणार

विवाहित असलेला व 3 मुलींचा पिता असलेला धर्मेंद्र हा अहमदाबादमध्ये मजूर म्हणून काम करतो. तो त्याचा कुटुंबाचा एकटाच आधार आहे. त्यामुळे धर्मेंद्रला झालेला अपघात ही त्याच्या सर्व कुटुंबासाठी दुर्दैवी घटना होती. सध्या कूपर रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या धर्मेंद्रने रुग्णालयातील डॉक्टरांचे आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात कुंजादास नावाच्या एका 27 वर्षीय सुतारकाम करणाऱ्या तरुणाच्या पायाचा पंजा करवतीने कापला गेला होता. मूळचा आसाममधील असलेल्या आणि मुंबईत उदरनिर्वाहासाठी आलेल्या कुंजादासवरदेखील कूपर रुग्णालयातच डॉ. नितीन घाग व त्यांच्या चमूने यशस्वी प्लॅस्टिक सर्जरी केली होती. यामध्ये उजव्या पायाचा पंजा जोडण्यात आला होता. हा तरुण साधारणपणे 8 महिन्यांच्या उपचारानंतर आता स्वत:च्या पायावर उभा राहू शकत आहे.