
हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचा आज वाढदिवस आहे. 5 नोव्हेंबरला जन्मलेला विराट 33 वर्षाचा झाला आहे. क्रिकेट विश्वामध्ये रनमशीन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहली याची जगातील यशस्वी कर्णधारांमध्येही गणना होते. मात्र आज वाढदिवशीच विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला कठोर परीक्षा द्यावी लागत आहे. टी-20 वर्ल्डकपमधील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी विराटसेनेला आज स्कॉटलंडचा सामना करायचा आहे. सेमीफायनलच्या रेसमध्ये कायम रहायचे असेल तर आज हिंदुस्थानच्या संघाला स्कॉटलंडचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागणार आहे.
विराट कोहली याने 18 ऑगस्ट 2008 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याआधी त्याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या युवा संघाने 2008 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. तसेच 2011 मध्ये हिंदुस्थानने श्रीलंकेचा पराभव करत एक दिवसीय विश्वचषक जिंकला. या संघाचाही विराट सदस्य होता. वयाच्या 23 व्या वर्षापर्यंत विराटने अंडर-19 वर्ल्डकप आणि एक दिवसीय वर्ल्डकप असे दोन मोठ्या स्पर्धा जिंकल्या. तसेच 2013 ला हिंदुस्थानने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघाचाही तो सदस्य होता.
कारकिर्दीच्या सुरुवातीपासून विराट कोहली याच्याकडे सचिन तेंडुलकर याचा वारसदार म्हणून पाहिले गेले. विराटनेही पदार्पणानंतर पहिल्या सात वर्षातच 23 शतक ठोकत स्वत:ला सिद्ध केले. विशेष म्हणजे यापैकी 10 शतक त्याने धावांचा पाठलाग करताना ठोकले. आज विराटच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23 हजारांहून अधिक धावा आहेत. यामुळे त्याचा जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये समावेश होतो.
23,159 intl. runs & going strong 💪
Most Test wins as Indian captain 👍
2011 World Cup & 2013 Champions Trophy-winner 🏆 🏆Wishing @imVkohli – #TeamIndia captain & one of the best modern-day batsmen – a very happy birthday. 🎂👏
Let’s relive his fine ton in pink-ball Test 🔽
— BCCI (@BCCI) November 5, 2021
यशस्वी कर्णधार
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 65 कसोटीत 38 विजय मिळवले असून 16 लढतीत पराभव स्वीकारला आहे. हिंदुस्थानच्या क्रिकेट इतिहासात 30 हून अधिक कसोटी सामने जिंकणारा विराट एकमेव कर्णधार आहे. विराटच्याच नेतृत्वाखाली हिंदुस्थानचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.
विदेशातही दमदार
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानसह स्वदेशासह अन्य 8 देशांमध्येही कसोटी खेळला आहेत. यातील 6 देशांमध्ये विराटने कमीत कमी एक सामना जिंकला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानमध्ये 30 पैकी 23 कसोटी सामने जिंकले आहेत. तसेच श्रीलंकेमध्ये 6 कसोटीत 5, वेस्ट इंडीजमध्ये 6 कसोटीत 4, इंग्लंडमध्ये 10 कसोटीत 3, ऑस्ट्रेलियामध्ये 7 कसोटीत 2, दक्षिण आफ्रिकेत 3 कसोटीत 1 विजय मिळवला आहे. बांगलादेशमध्ये खेळलेली एकमेव कसोटी अनिर्णित राहिली होती, तर न्यूझीलंडमध्ये मात्र त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या दोन्ही कसोटीत हिंदुस्थानचा पराभव झाला.
वन डेमध्येही विजयाची टक्केवारी जास्त
कसोटीस एक दिवसीय क्रिकेटमध्येही विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आहे. विराटने 95 एक दिवसीय लढतीत 65 विजय संघाला मिळवून दिले, तर टी-20 मध्येही 48 लढतीत 28 सामने हिंदुस्थानने जिंकले आहेत. क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात मिळून त्याच्या नावावर 131 विजयांची नोंद आहे.
आयसीसीची स्पर्धा जिंकण्यात अपयशी
विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा त्याच्या नावावर आहे. मात्र कर्णधार म्हणून त्याच्या नावापुढे एकाही आयसीसी विजेतेपदाची नोंद नाही. 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019 चा वन डे विश्वचषक आणि 2021 ची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानचा संघ विजेतेपदाच्या जवळ पोहोचला होता, मात्र चषक जिंकू शकला नाही.































































