
विजय जोशी
कोरोनाने नातेगोते, मैत्रीचे संबंध जवळ आणले तसे दूरही नेले. अशात कोरोनाने मृत्यू झाला तर त्या मृतदेहाचा अखेरचा प्रवास पाहून काळजाला पीळ पडतो. पण नांदेडच्या हॅपी क्लबमुळे हा पीळ काहीसा कमी झाला आहे. मुस्लिम तरुणांच्या या क्लबने गोवर्धन घाटावर पाच दिवसांत 57 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. यातील बहुतांश कोरोनाचे बळी होते.
नांदेड शहराची कोरोनाने दाणादाण उडवली आहे. दररोज वाढणारी रुग्णसंख्या, गल्लीबोळात फिरणाऱया रुग्णवाहिका आणि काळीज चिरत जाणारे मृत्यूचे आकडे पाहून नांदेडकर हादरून गेले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून नांदेडमध्ये कोरोना मृत्यूचा दर वाढला आहे. शहरात रामघाट, मरघाट, सिडको, डंकीन, मार्कंडेय आदी घाटांवर अंत्यसंस्कार केले जातात.
कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला कल्पना देऊन गोवर्धन घाटावर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येतो. तेथे या मृतदेहाला अखेरचा निरोप देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे हॅपी क्लबने! पाच दिवसांत या घाटावर 57 जणांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यापैकी 40 पेक्षा जास्त मृत्यू हे कोरोनामुळे झाले होते, तर उर्वरित वृद्धापकाळ, आजारी असलेले होते.
कोणतीही अपेक्षा न ठेवता…
प्रशासनाकडून निरोप आला की मोहंमद शोएब, मोहंमद खालेद, शेख अल्ताफ, शेख युनूस, कुरेशी, मोहंमद दाईम, गौस कुरेशी, महंमद कासिम खान, मुनवर खान, मोहंमद बागवान, जुनेद खान सौदागर, रशीद खान, मिर्झा सोहेल अब्दुल सलाम, महंमद अफसर, अली सय्यद युनूस, यासीन हे हातातील काम सोडून गोवर्धन घाटावर धाव घेतात. सरण रचण्यापासून ते मुखाग्नी देण्यापर्यंतचे सर्व विधी हेच तरुण करतात. महापालिकेकडून त्यांना पीपीई किट देण्यात येते. विशेष म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता हे तरुण अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडतात.
कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी कोणीही पुढे येत नाही. हे पाहून अतिशय वाईट वाटले आणि आम्ही काही मित्रांनी त्यासाठी पुढाकार घेतला. सुरुवातीला भीती वाटायची. पण आमच्या घरच्यांनी पाठबळ दिले. कोरोनाचे सर्व नियम पाळून आम्ही अंत्यसंस्कार करतो.
– मोहंमद शोएब, हॅपी क्लब

























































