
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंडय़ा बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापासून संघातून बाहेर आहे. त्याच्या घोटय़ाला दुखापत झाली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी हार्दिक पंडय़ा हा बंगळुरूमधून मुंबईत दाखल होणार असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे तो श्रीलंका किंवा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिक पंडय़ा हा अजून काही सामने तरी मैदानावर उतरू शकणार नाही. हार्दिक पंडय़ाची दुखापत फार गंभीर नाही. त्याच्या घोटय़ाच्या लिगामेंटला मायनर टीअर आहे. तो चांगल्या पद्धतीने रिकव्हर होत आहे. तो लीग स्टेजमधील शेवटच्या सामन्यात संघात परतण्याची शक्यता आहे. याचबरोबर तो थेट सेमी फायनल राऊंडमध्ये खेळण्याचीदेखील दाट शक्यता आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
निवृत्तीची हीच योग्य वेळ
इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. 33 वर्षांचा हा अष्टपैलू खेळाडू वर्ल्ड कपनंतर आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवणार आहे. विलीने निवृत्तीचा निर्णय इन्स्टाग्रामवर भली मोठी पोस्ट लिहून जाहीर केला. डेव्हिड विलीने 2015 मध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये विद्यमान जगज्जेता असलेल्या इंग्लंड संघाची फारच निराशाजनक कामगिरी झाली. डेव्हिड विलीने निवृत्तीची घोषणा करताना लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ’हा दिवस कधीच येऊ नये असेच वाटत होते. इंग्लंडसाठी क्रिकेट खेळण्याचे माझे बालपणापासूनचे स्वप्न होते. त्यामुळे खूप विचारांती मी हा अवघड निर्णय घेतलाय. मला निवृत्तीची हीच योग्य वेळ वाटली. वर्ल्ड कपनंतर मी क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमधून निवृत्त होत आहे.’































































