
शमिका कुलकर्णी (आहारतज्ञ)
सकाळचा व्यायाम किंवा चालणे हा बऱ्याच जणांच्या जीवनशैलीचा आरोग्यदायी भाग आहे. त्याचबरोबर सकाळचे चालणे झाल्यानंतर आरोग्यपूर्ण पेय म्हणून विविध भाज्यांचे रस पिणे हाही अनेकांच्या सकाळच्या दिनचर्येचा भाग असतो. दुधीचा रस, कारल्याचा रस, गाजराचा रस, गव्हाच्या तृणांकुरांचा रस आम्ही सकाळी पितो म्हणून अनेकजण स्वतःचीच पाठ थोपटून घेतात. दुधीचा रस प्यायल्याने एका महिलेचा मृत्यू ही बातमी नुकतीच आली. मुळात हे रस खरोखरच आरोग्यदायी असतात का…? की ते केवळ एक फॅशनेबल रंगीत पाणी असतं…?
सध्या वजन कमी करण्यासाठी बरेच जण वेगवेगळे उपाय करत असतात. इंटरनेटवरही याविषयी माहिती उपलब्ध असते. त्यामुळे आहार करायचा याची शास्त्रशुद्ध माहिती न घेता तो घेतला तर योग्य आहे की नाही याचा विचार व्हायला हवा. कारण काही वेळा ही बाब तब्येतीला घातक ठरते. कडू दुधीचा रस प्यायल्याने काही दिवसांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. यामागे दुधी विषारी असणं किंवा त्याचा रस घेण्याच्या अतिप्रमाणामुळे विषबाधा होऊ शकते.
अनेकजण सकाळी व्यायामानंतर कच्च्या भाज्यांचे रस काढून पितात. कधी कधी लोक पार्कमध्ये फिरायला गेल्यावर तेथे मिळणारे रस विकत घेतात, मात्र त्यामुळे नुकत्याच घडलेल्या घटनांमुळे अनेकांच्या मनात प्रश्न पडत असेल. दुधी भोपळा, भोपळा, काकडी, पडवळ या भाज्यांचे रस पिणे आरोग्यदायी आहे का यावर नक्कीच विचार करायला हवा. अशा प्रकारचा भाज्या ‘क्युक्युरबिटा’ या वर्गातील असून हे मूलद्रव्य विषारी असतं. ते दुधी किंवा या वर्गातील इतर भाज्यांमध्ये असेल तर त्या कडवट, तुरट लागतात. अशा भाज्या कच्च्या किंवा ज्यूसच्या माध्यमातून प्यायलो तर विषबाधा होऊ शकते. दुधी मुळात कडू नसला तरीही अशा प्रकारच्या दुधीत या मूलद्रव्याचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीराला घातक ठरते. ग्लासभर रसामुळे विषाचं प्रमाण वाढतं.
दुधीतील गुणधर्म
– दुधीत लोह, कॅल्शियम, फॉस्फरस अशी अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे तो आरोग्यदायी आहे. ऑण्टिऑक्सिडंट आणि इतर जीवनसत्त्वांचे प्रमाण जास्त असल्याने शरीर निरोगी राहते.
– भाजी, रायता अशा प्रकारे दुधी सेवन केल्याने पचनक्रियेला उपयुक्त ठरते. कारण त्यामध्ये तंतुमय पदार्थ असतात.
– बद्धकोष्ठतेच्या त्रासावर दुधी गुणकारी आहे.
– दुधी कमी उष्मांकाचा असतो. त्यामुळे वजन कमी करणाऱ्या त्याचा उपयोग होतो. मात्र रसाऐवजी भाजी, रायता, कोशिंबीर, थालीपीठ अशा पद्धतीने खावा.
– दुधी थंड प्रवृत्तीचा असून त्यामध्ये ९६ टक्के पाण्याचा समावेश असतो. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करणे, पाण्याचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होते.
– मूत्राशयाच्या विकारावर दुधी अतिशय गुणकारी आहे.
भाज्यांचे रस पिणं योग्य आहे का?
भाज्यांच्या रसात औषधी गुणधर्म असतात, असे आयुर्वेदात सांगितलं आहे, पण हे रस औषधाच्या प्रमाणातच प्यायला हवेत. शिवाय ते किती प्रमाणात प्यायला हवेत याविषयी वैद्यांकडे सल्ला घ्यावा. वजन कमी करण्यासाठी दुधी, कारल्याचे रस ग्लासभर प्यायले जातात, पण एवढे रसाचे प्रमाण शरीरासाठी आवश्यक आहे का याची शहानिशा वैद्य किंवा आहार तज्ञांकडून करून घेऊनच प्यावेत. मुख्यतः रस बनवताना त्यातली जीवनसत्त्वं नष्ट होतात. जर तो गाळून घेतला असेल तर त्यातील तंतुमय पदार्थही निघून जातात. फक्त रंगीत पाणी राहतं आणि तेच प्यालं जातं. त्यामुळे शरीरासाठी त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे रस पिण्यापेक्षा फळं, भाज्या खाण्यावर भर द्यावा.
विषबाधा न होण्यासाठी
– दुधी भोपळा, साधा भोपळा, काकडी, कारलं, शिराळे, पडवळ, घोसाळं अशा भाज्या विकत घेताना कोवळ्या आणि ताज्या बघून घ्याव्यात.
– भाजी चिरताना तिचा छोटासा तुकडा खाऊन बघावा. तो जर कडू लागला तर सगळी भाजी टाकून द्यावी.
– कच्च्या भाज्यांचे रस शक्यतो पिऊ नयेत. प्यायचेच असतील तर कोणतेही मिश्रित पिऊ नयेत. म्हणजे दुधी आणि कारलं किंवा दुधीसोबत अजून दुसरी एखादी भाजी एकत्र केली असेल तर कोणती भाजी कडू आहे हे कळत नाही, म्हणून कुठलेही मिश्रित रस पिऊ नयेत.
– कच्च्या भाज्यांचा रस प्यायल्यानंतर उलटी, जुलाब, अतिसार असे त्रास झालेच तर जवळच्या रुग्णालयात दाखल व्हावं. योग्य ते उपचार करावेत.
गैरसमज
दुधीचा रस प्यायल्याने वजन कमी होते हा गैरसमज आहे. कारण रस प्यायल्यानंतर शरीराला गरज हवे असलेले घटक योग्य प्रमाणात शरीराला मिळत नाहीत. त्यामुळे हा आहार अर्धवट राहतो. त्यामुळे सकाळी न्याहारीऐवजी रस पिणे हे अयोग्य आहे. मुख्यतः प्रथिने, जीवनसत्त्वे मिळत नाहीत. ती रस तयार करतानाच नष्ट झालेली असतात. त्यामुळे बेताचा आणि औषध म्हणून रस घेतला तरच तो आरोग्यदायी ठरेल.
घरच्या घरी रस करताना…
– स्वच्छतेची काळजी घ्या.
– रस औषध म्हणून किती घ्यावा याचं प्रमाण लक्षात घ्यायला हवं.
– त्यातील तंतुमय पदार्थ गाळून घेऊ नयेत.
– या सूचनांचे पालन केले तर भाज्यांचे रस नक्कीच आरोग्यदायी ठरतील. दुष्परिणाम होणार नाहीत.
–

























































