दीर्घायु भव – हेमंत ऋतू अन् मांसाहार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसानंतर येणारा शरद संपून हेमंत ऋतू सुरू होत आहे. थंडी जोर पकडू लागली आहे. हेमंत ऋतू म्हणजे वर्षभरातील तो काळ ज्यामध्ये आपल्या शरीरातील पाचनशक्ती अतिशय उत्तम असते. अशा वेळी पंचपक्वान्नासारखे प्रचंड जड पदार्थसुद्धा सहज पचू शकतात. शरीराचे पोषण याच ऋतूमध्ये सर्वात उत्तम होत असते. याचाच लाभ घेत आहारात मांसाहार कसा अंतर्भूत करता येतो, याबद्दल आयुर्वेदामधे सांगून ठेवले आहे.

मांसाहार विविध पद्धतीने बनवला जातो. त्यामध्ये पचनास हलके, पचनास जड असे अनेक प्रकार आहेत. त्यांचे शरीरावर होणारे परिणाम समजून घेतले तर नेमकेपणाने चविष्ट पदार्थही पथ्य म्हणून वापरता येतात. हा दृष्टिकोन आयुर्वेद कायमच विचारात घेतो. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टींच्या पाककृती कशा बनवायच्या त्याबद्दल मार्गदर्शनही करतो.

हेमंतात मांस खाण्याचे नियम –

1) पचनास गरम, जड, गोड असे मांस खावे. साधारणतः   पाण्यात राहणारे प्राणी, पाणथळ जागेत राहणारे प्राणी आणि पक्षी,  उष्ण आणि दमट हवामानातच्या प्रदेशातील पक्षी,  बिळात राहणारे प्राणी-पक्षी यांचे मांस हेमंतात खाता येते. इतर ऋतुंमध्ये मात्र हे मांस पचवणे अवघड जाते. ‘प्रसह वर्ग’ म्हणजे लचके तोडून मांस खाणारे प्राणी-पक्षी. या वर्गातील प्राण्यांचे मांससुद्धा हेमंतात खाता येते असा निर्देश आहे. यातील बरेच प्रकार वन्य जीव असल्याने ही बंदी आहे. या सर्व प्रकारातील आजकाल उपलब्ध असलेले मांसप्रकार खालील प्रमाणे आहेत.

पाण्यात राहणारे प्राणी – साधारणतः आपल्या खाण्यातील मासे, शेल फिश यामध्ये येतात. (शेल फिश म्हणजे – कोलंबी, खेकडे, शंख, शिंपले इत्यादी.) (आयुर्वेदानुसार बेडकाचे मांस कधीही न खाण्याच्या वर्गातील आहे. टाळलेलेच बरे.)

पाणथळ जागी राहणारे प्राणी आणि पक्षी – मगर, बगळे, हंस इत्यादी प्राणी ‘वन्यजीव’ असल्याने त्यावर आपल्याकडे बंदी आहे. परदेशात मात्र असे अनेक मांसप्रकार मिळतात.  हेमंतात बदकाचे  मांस पचवता येऊ शकते. दक्षिणेकडे बदक नियमित खातात.

उष्ण, दमट प्रदेशातील आणि बिळात राहणारे प्राणी आणि पक्षी – यामध्ये डुक्कर, म्हैस, रेडा असे अनेक प्राणी खाल्ले जातात. अन्य प्राणी-पक्षी वन्यजीव कायद्याअंतर्गत मारण्यास  बंदी आहे. बंदी असलेल्या प्राण्यांपैकी रानडुक्कर, ससे हे प्रकार आजही गावाकडील लोक मारून खातात. कायद्याने त्यांना मारणे अयोग्य आहे.

प्रसह वर्ग प्राणी आणि पक्षी मांस – आज या वर्गातील जवळजवळ सर्वच प्राणी वन्यजीव कायद्याच्या अंतर्गत मारणे निषिद्ध आहे. (वाघ, सिंह, मगर, गिधाड वगैरे सर्व प्राणी-पक्षी यात मोडतात.)  बाकी मांस खावे की, न खावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याउपर कायदा मोडून उगाच काहीही करणे टाळावे हे सर्वात योग्य असते.

2) हेमंतात भाजून केलेले मांसप्रकार खावेत असे आयुर्वेद सांगतो.  कोंबडी, बोकड, मेंढा, रेडा, डुक्कर, मासे, खेकडे, शंख, शिंपले असे वरील वेगवेगळे मांस प्रकार आपण पाहिले, ते या ऋतूमधे भाजून खाल्ले तर सर्वात उत्तम, असे आयुर्वेदात सांगितले आहे.  मांस भाजून खाल्ले की शरीरावर मांस वाढण्यासाठी सर्वात जास्त फायदा होतो.  भाजण्यापुर्वी त्यावर चवीसाठी आणि पचनास फायदा होण्यासाठी तूप/तेल, हळद, आले, लसूण, मिरची, कढीपत्ता, पुदिना, हिंग, ओले खोबरे/सुके खोबरे, गरम मसाला, मिरची, शेंगदाणे, मोहोरी, दालचिनी, तमालपत्र, लवंग, काळी मिरी यांपैकी गोष्टींचा वापर आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने करावा.

मसाला वाटून त्यात मांस आधी मुरवावे आणि मग भाजावे. त्याने मांस पचनास हलके होते. बरेच वेळा मुरवण्यासाठी दही वापरतात. ज्यांची भूक उत्तम आहे. अम्लपित्त, रक्ताचे रोग, डोकेदुखी असे कोणतेही त्रास ज्यांना नाहीत, त्यांनी आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने दही वापरावे.

3) हेमंतात मांस खाताना त्यासोबत विशिष्ट मद्य प्रकार सेवन केले तर त्याने मांस पचनास फायदा होतो असे ही नियम आहेत. यामध्ये ‘मदिरा’, ‘सीधू’ असे विशिष्ट प्रकार ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहेत. आजच्या मद्य प्रकारांपैकी ‘रम’ हा प्रकार गुणाधारे त्याच्या जवळ जाणारा ठरतो. हेमंतात ज्या प्रकारचे मांस खाण्याचा निर्देश आहे, त्या प्रकारचे मांसात चरबी आणि स्नेहांश मोठय़ा प्रमाणात असतो. ते पचवण्यासाठी मदत मिळावी म्हणून मद्यप्रकार वर्णन केले आहे. मद्यप्राशन करतानाचे नियम ही आयुर्वेद  विस्तृतपणे वर्णन करतो. इथे कुठेही मद्यप्रचार हा हेतू नाही.

4) सूप – पचनासाठी सुलभ पदार्थ म्हणजे सूप.  पथ्य म्हणून कोणत्याही रोगांमध्ये हे उत्तम काम करते. शाकाहार किंवा मांसाहार, कशाचेही बनू शकते. जसे चिकन सूप, मटण सूप, पाया सूप, लिव्हर सूप, भेजा सूप, कपुरा सूप इत्यादी मांसाहारातील सुपचे प्रकार. हेमंतात या सूपमध्ये आले, लसूण, मिरची, काळी मिरी, ओवा, सैंधव, मीठ यांपैकी प्रकार आवर्जून वापरावेत. यापुढे येणारे दोन महिने हेमंत ऋतूचे समजावेत आणि नियम पाळत आहाराचा आस्वाद घ्यावा म्हणजे स्वस्थ जीवन अबाधित राखणे सोपे होईल.

>> वैद्य सत्यव्रत नानल, [email protected]