
>> वैद्य सत्यव्रत नानल
कुपोषण म्हणजे मरतुकडी मुले असा समज कधीही करून घेऊ नये. अतिरिक्त पोषण न पचल्याने, पचन न झाल्यामुळे शरीरातल्या विशिष्ट घटकांचे कुपोषण होते. सोबत मनाचे कुपोषणही सुरू होते, ते सुधारणे गरजेचे असते. यासाठी फक्त औषधे नव्हे तर चांगला आहार आणि इतर सवयींबद्दल मार्गदर्शन महत्वाचे आहे. लहान मुलांमध्ये भूक न लागणे, भाज्या न आवडणे अशा तक्रारी घेऊन अनेक कुटुंब येतात. एका जागी ं स्थिर न बसणे, चिडचिड करणे, मनाविरुद्ध काहीही झाले की जोरजोरात रडणे, आदळआपट करणे, वस्तू फेकणे अशा प्रकारच्या तक्रारीही मुलांमध्ये मोठय़ा प्रमाणात दिसतात. ही सर्व लक्षणे कुपोषणाची आहेत. यासाठी महागातले पोषक अन्न खाणे असा अर्थ नसून खाल्लेले अन्न नीट पचवू न शकणे याचा यात मोठा भाग आहे.
आहारातील काही सोपे उपाय जे शरीर आणि मनाचे पोषण सुधारतील, होणारे त्रास कमी करतील, ते आहेत–
पंचामृत – दूध, दही, तूप, मध आणि साखर या पाच गोष्टी अर्धा किंवा एक चमचा असे समप्रमाणात घेऊन एकत्र करावे. याला पंचामृत म्हणतात. याने संपूर्ण शरीर आणि मनाचे उत्तम पोषण लगेच होते. शरीरावर मांस वाढते, चिडचिड कमी होते.
चीज – चीज 10 ग्रॅम, मध अर्धा टेबलस्पून आणि काळी मिरी एक चिमूट असे मिश्रण आठवडय़ातून दोन वेळ चघळून खायला द्यावे. याने फुप्फुसांची कार्यक्षमता पटापट वाढते. प्रतिकारक्षमता वाढते.
तूप – इंद्रियांना पोषण देणारे या पृथ्वीवरील अमृत म्हणजे गायीचे तूप. हे तूप जेवणात, पोळीला लावून, भातात घालून, गूळ, तूप आणि साखर, खजूर आणि तूप, मोरावळा आणि तूप, मेथांबा आणि तूप असे एकत्र करून जेवणात दिल्याने प्रचंड फायदा होतो.
सुकामेवा (ड्रायफ्रूट) – बदाम, पिस्ता, अक्रोड, काजू, जर्दाळू, अंजीर, मनुका, बेदाणे इत्यादी प्रकार लहान मोठय़ा सर्वांसाठीच पोषणाचा राजमार्ग आहे. लहान मुलांना हे प्रकार दिवसभरात थोडे थोडे देऊन त्यांचे पोषण सुधारणे सहज शक्य आहे. खायला आवडत नसेल तर पाण्यात भिजवून बारीक करून पातळ सरबत बनवून द्यावे.
मांसाहार – जे लोक मांसाहार करतात त्यांच्यासाठी चिकन, मटण, पाया, लिव्हर, भेजा सूप करून लहान मुलांना दिले तर त्या-त्या अवयवांचे पोषण होऊन ताकद वाढवण्याचे कार्य उत्तम होते. पचायला सर्वात सुलभ प्रकार म्हणजे सूप. म्हणून लहान मुलांना सूप नियमित द्यावे. वाफवलेले प्रकार उत्तमच. मसालेदार कालवण, भाजून, तळून केलेले प्रकार लहान मुलांना पचत नसतील तर देऊ नयेत किंवा कमी वेळा आणि कमी प्रमाणात द्यावे. चिकन, मटण सूपमधेच भात, भाजी, शिजवावी म्हणजे मुले खायला लागतात.
लोणी – ताजे लोणी म्हणजे दुसरे अमृत होय. त्यात साखर किंवा मध घालून खाल्ल्यास मन आणि शरीराचे पोषण सर्वोत्तम होते. आवडत नसेल तर वरण-भातात मिसळावे. दुधात मिसळून दिले तर पोटही साफ होते आणि पचनही सुधारते.
ताजी फळे – लहान मुलांना ताजी फळे देऊ नयेत. हापूस आंबा चालतो. बाकी फळे मात्र देऊ नयेत.
काही सोप्या गोष्टी केल्या तर उत्तम फायदा होतो –
वयाच्या 12 वर्षांपर्यंत मुलांना नियमितपणे सर्वांगास मालिश केल्याने भरपूर फायदा होतो. पाठीचा कणा आणि पायांवर तेलाने मालिश केल्यास मुले एका जागी स्थिर बसू लागतात. मुले मालिश करून घेत नसतील तर ती झोपल्यावर त्यांना मालिश करावे. यासाठी कोमट केलेले तीळ तेल वापरावे.
म़ुलांच्या नाकात एक-एक थेंब साजूक तूप सोडावे किंवा मालिश करतानाच जिरवावे. याने मुलांची सहनशक्ती वाढते आणि चिडचिड कमी होते.
मुलांना वारंवार सर्दीचा त्रास होत असेल तर त्यासाठी वैद्यांकडून आहार आणि औषधे घेतल्यास फायदा होतो. वारंवार सर्दी झाल्याने लहान वयातच चष्मा लागू शकतो. त्यामुळे मूळ सर्दीची चिकित्सा व्हायला पाहिजे.
मुले झोपताना पिंवा झोपल्यानंतरचा पाहिल्या तासात त्यांना मारुती स्तोत्र, हनुमान चालिसा, रामरक्षा, अभंग, भजने, कविता, बडबडगीते यापैकी नियमित ऐकवावे. याने मुलांची एकाग्रता वाढते. चिडचिड कमी होते. ऐकून घेण्याची सवय निर्माण होऊ लागते.
मोबाईल किंवा टीव्हीसमोर बसवून मुलांना जेवण भरवणारी तमाम पालक मंडळी आहेत. तुम्ही तुमचा वर्तमानकाळ सुलभ करत असलात तरी मुलांचे भविष्य कायमचे बिघडवत आहात. अशा प्रकारे मुलांना सवयी लावू नका.
रेंगाळत, इकडे तिकडे पळत जेवणारी मुले यांना शिस्त लावा. एका जागेवर बसवून घडय़ाळात वेळ लावून तेवढय़ा वेळेतच जेवले पाहिजे अशी सक्ती करा. कारण मुलांचे पोषण आणि भविष्य दोन्हींचा प्रश्न आहे. हे होत नाही म्हणूनच, ह्युमन सायकॉलॉजी, चाईल्ड सायकॉलॉजी अशा विषयांमधील तज्ञांचे काम गेल्या काही वर्षांत भरपूर वाढलेले आहे.


























































